मडगाव-नागपूर नियमित रेल्वेसेवेची मागणी

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर मडगाव ते नागपूर या मार्गावर नियमित गाडी सुरू करावी, अशी मागणी दापोलीतील वैभव बहुतुले यांनी प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली ही महत्त्वाची ठिकाणे असून ती वेगाने विकसित होणारी शहरे आहेत. दापोलीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत. कोकण कृषी विद्यापीठात नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे.

नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव केळीची मोठी बाजारपेठ आणि केळीची मोठी उत्पादन केंद्रे आहेत. कोकणात या उत्पादनांना मागणी असते.

रत्नागिरीतील हापूस आंबा आणि सिंधुदुर्ग प्रसिद्ध देवगड हापूस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी खेळणी या मार्केटमुळे आयात-निर्यात होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर, अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबाग मुख्यालय, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती पाहण्याकरिता कोकणातील अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात आवर्जून जातात.
मडगाव-नागपूर नियमित रेल्वेसेवा सुरू झाली, तर धार्मिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यांची नाळ जोडली जाऊल शकेल. त्यामुळे ही गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

कोकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीमुळे असंख्य प्रवाशांची सोय होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग परिसरातून नागपूरसाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागतो. या साऱ्याचा उल्लेख श्री. बहुतुले यांनी निवेदनात केला आहे. त्याचा विचार करून मडगाव ते नागपूर नियमित रेल्वे सेवा सुरू करावी, असे श्री. बहुतुले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply