रत्नागिरीत ९, तर सिंधुदुर्गात १० नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जानेवारी) करोनाचे नवे ९ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत मृत्यूची नोंद आज झालेली नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार खेडमध्ये २, तर चिपळूण आणि देवरूखमध्ये प्रत्येकी ३, रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार खेड येथे १ बाधित रुग्ण आढळलेा. (दोन्ही मिळून एकूण ९). एकूण रुग्णांची संख्या आता ९४२१ झाली आहे. आज आणखी २६२ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६४ हजार ३८३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८५ आहे. त्यातील सर्वाधिक ३१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८९६९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.२० टक्के झाला आहे. आज नव्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची संख्या ३४० एवढीच असून मृत्युदर ३.६१ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज १० नवे करोनाबाधित आढळले, तर २२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६१०६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५७१६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ एवढीच आहे.

लसीकरण

दरम्यान, शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्याचा कार्यक्रम कालपासून सुरू झाला आहे. त्यामध्ये कालच्या दिवसात ५०० पैकी २४५ (४९ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. जिल्हा रुग्णालय, गुहागर आणि राजापूर ग्रामीण रुग्णालय तसेच दापोली आणि कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४५ जणांना लस देण्यात आली. सर्वाधिक ७९ कर्मचाऱ्यांना गुहागरमध्ये, तर सर्वांत कमी २३ कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात लस देण्यात आली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply