ज्येष्ठ भजनीबुवा तुकारामबुवा शिंदे यांचे १०२व्या वर्षी निधन

लांजा : खोरनिनको येथील ज्येष्ठ वारकरी आणि भजनी बुवा तुकाराम बुवा शिंदे यांचे वार्धक्याने १०२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

लांजा पूर्व विभागातील खोरनिनको गावातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त, खोरनिनको-प्रभानवल्ली भागातील वारकरी संप्रदायाचे प्रतीक, अत्यंत निर्मळ मनाचे भजनीबुवा म्हणून तुकाराम गंगाराम शिंदे म्हणजेच शिंदे बुवा प्रसिद्ध होते. ते वारकरी संप्रदायाचा चालता बोलता ज्ञानकोशच होते. त्यांची वाणी मधुर होती. डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशीची माळ, मस्तकी चंदनाचा टिळा अशा साध्या वेशातील बुवा जुन्या काळात डबलबारी भजनाचे सामने करत असत. मात्र डबल बारी हे खरे भजन नाही. त्याने वादविवाद होतात, मने दुखावतात, या कारणासाठी त्यांनी डबलबारी भजन सोडून दिले. नेहमीचे बैठे भजन, श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी हरिपाठ ते नित्यनेमाने करत असत.

तुकाराम गाथा, एकनाथ गाथा त्यांना पूर्णपणे मुखोदगत होती. त्यांनी स्वतः कीर्तन केले नाही. मात्र इतरांना ते करण्यासाठी चालना दिली. अन्य कीर्तनकार करत असलेल्या कीर्तनात प्रसंगानुरूप अभंग म्हणण्यात त्यांचा हातखंडा होता. खोरनिनको येथील कुलदेवता सेवा मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे तुकाराम बीज साजरी केली जाते. त्यासाठी पंढरपूरमधून येणारे वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांचाही शिंदे बुवांवर विशेष लोभ होता. शतकीय वयोमान होऊनही त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या जमान्यातील आठवणी तसेच खोरनिनको शाळेच्या स्थापनेपासूनचे अनेक संदर्भ, ऐतिहासिक माहिती ते देत असत.

वार्धक्यामुळे काही वर्षे त्यांचे वास्तव्य रत्नागिरीला होते, तर गेली ३-४ वर्षे ते मुंबईत त्यांच्या मुलांकडे राहत होते. तेथेच त्यांचे १६ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने खोरनिनको-प्रभानवल्ली परिसरातील वारकरी संप्रदायाचा आधारवड हरपल्याची भावना भांबेड पंचक्रोशीमध्ये व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात मनोहर, मोहन, मारुती आणि रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रभारी सचिव/लेखापाल दिगंबर ही मुले तसेच कन्या सौ. लता ही विवाहित मुले, नातवंडे, पतवंडे असा सुमारे ५० जणांचा परिवार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply