रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे पुनरुज्जीवन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ नव्याने उभारण्यात आला असून आता तो सक्रिय झाला आहे. सर्वसामान्य शेतकरी, आंबा, काजू बागायतदारांना फवारणीसाठी अल्प दरात कीटकनाशके, शेतीसाठी अवजारे, भात खरेदी यासह आंबा-काजू विक्रीकरिता संघातर्फे मदत करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यात सामील करण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे, अशी माहिती संघाचे मुख्य प्रवर्तक, अध्यक्ष बाळ माने यांनी दिली.

मारुती मंदिर येथील अरिहंत स्पेस सेंटरमध्ये संघाच्या नव्या कार्यालयात झालेल्या पहिल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, १९९३ ते २००३ पर्यंत मी तालुका संघाचा अध्यक्ष होतो. पूर्वीच्या काळात संघाचे अध्यक्ष म्हणून माझे वडील (कै.) यशवंतराव माने यांनीही काम पाहिले. गतवर्षी करोना काळात दलालांवर अवलंबून असलेल्या बागायतदारांना परजिल्ह्यात आंबा पाठवताना अडचणी आल्या. त्यावेळी संघामार्फत मदत करता येऊ शकते, हे ध्यानात आले. त्यानंतर आता शासनमान्यतेने नव्याने संघ सुरू करण्यात आला आहे. यात २१ संचालक असून विविध सहकारी सोसायट्यांना सभासद करून घेण्यात येत आहे. भागभांडवलही उभे करण्यात येत आहे. त्याकरिता नियोजन करण्यात आले.

यावेळी भागभांडवल उभे करण्यासाठी सर्व संचालकांनी तयारी दर्शवली. तसेच गोदामासाठी अशोक मयेकर यांनी दांडेआडोम येथील जागा विनामोबदला देण्याचे मान्य केले. आंबा फवारणीची औषधे महागडी आहेत. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून संघाच्या माध्यमातून कंपन्यांकडून थेट औषधे व खते खरेदी करून ती अल्प दरात शेतकर्यांाना देण्यात येणार आहेत. भातखरेदीचाही प्रस्ताव समोर आहे. भातबियाणे, भाजीपाला बियाणे, आंबा-काजू खरेदी विक्रीसाठी लागणारे सर्व सहकार्य केले जाणार आहे.

बैठकीला सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते. नूतन संचालकांची नावे अशी- मुख्य प्रवर्तक बाळ माने, संचालक- सतीश शेवडे, संतोष सुर्वे, नाना शिंदे, अशोक मयेकर, दादा दळी, प्रमोद रेडीज, प्रकाश पवार, श्यामसुंदर सावंतदेसाई, गजानन धनावडे, प्रसन्न दामले, चंद्रकांत भावे, हनीफ धामस्कर, शलाका लाड, संघमित्रा कुरतडकर, अॅड. भाऊ शेट्ये, अनंत आखाडे, संदीप मोहिते, संतोष सावंत, प्रकाश साळवी आणि रूपेश नागवेकर.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply