रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात १४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ जानेवारी) करोनाचे नवे १२ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १४ नवे रुग्ण आढळले, तर ३४ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरीत आज दोघांचा मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार लांज्यात चार, रत्नागिरीत दोन, तर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळला. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी, दापोली, खेड आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून एकूण १२). जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९४३३ झाली आहे. आज आणखी ११४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६४ हजार ४९७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९० आहे. त्यातील सर्वाधिक ३७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २१ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज १६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८९८५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.२५ टक्के झाला आहे. आज जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३४२ झाली असून, मृत्युदर ३.६२ टक्के झाला आहे. लांजा तालुक्यातील ७१ वर्षीय पुरुष आणि दापोली तालुक्यातील ७५ वर्षीय महिला यांचा आज सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज १४ नवे करोनाबाधित आढळले, तर ३२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६१२० झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५७४८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ एवढी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरण

शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्याचा कार्यक्रम दोन दिवसांपासून सुरू झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात २० जानेवारी रोजी ५०० पैकी २९१ (५८.२ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय, गुहागर आणि राजापूर ग्रामीण रुग्णालय, तसेच दापोली आणि कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २९१ जणांना लस देण्यात आली. सर्वाधिक ७१ कर्मचाऱ्यांना गुहागरमध्ये, तर सर्वांत कमी ३८ कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर कोणालाही विपरीत परिणाम जाणवल्याची नोंद नाही.दरम्यान, शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्याचा कार्यक्रम कालपासून सुरू झाला आहे. त्यामध्ये कालच्या दिवसात ५०० पैकी २४५ (४९ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. जिल्हा रुग्णालय, गुहागर आणि राजापूर ग्रामीण रुग्णालय तसेच दापोली आणि कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४५ जणांना लस देण्यात आली. सर्वाधिक ७९ कर्मचाऱ्यांना गुहागरमध्ये, तर सर्वांत कमी २३ कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात लस देण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply