नांगर धरणाऱ्या गावकऱ्यांनी बनविली वेबसिरीज

रत्नागिरी : तंत्रज्ञानाशी कोणतीही सलगी नसलेल्या, पण प्रचंड ‘हौस’ असलेल्या साध्या-भोळ्या शेतकरी गावकऱ्यांनी चक्क वेबसिरीज तयार केली आहे. देऊड-चाटवळवाडी (ता. रत्नागिरी) येथील ग्रामस्थांनी ही मजल मारली आहे.

दरवर्षी गावपूजेला केवळ स्थानिक कलाकारांचे नाटक बसविणारी ही मंडळी करोनामुळे काहीसी नर्व्हस झाली होती. पण लॉकडाउनमध्ये घरातल्या घरात बसून त्यांनी वेबसिरीज करायचे ठरवले. अगदी साठ वर्षांपासूनची लहान मुलांपर्यंतचे सारे ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यातूनच कोकणातील गूढ घटनेचा पाठलाग करणारी ‘रानभूल’ ही वेबसिरीज तयार झाली आहे. ती लवकरच यूट्यूबवर येत आहे.

देऊड हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे गावाजवळचे गाव आहे. गावच्या उशाला डोंगराळ सडा आणि कातळ, चौपाखी कौलारू आणि लालशार मातीने लिंपलेली घरं, दारी शेणाने सारवलेले गुळगुळीत अंगण आणि लिंपलेले बांध, गार सावली देणारे मजबूत बांध्याचे बांबूचे मांडव, घराभोवती भाताचे दळे आणि त्यात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या भाताच्या उडव्या, खोपटी, गुरांची उन्हाळी कावणे, घनदाट आमराया, लगडलेल्या चिंचेची झाडे असे एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे गाव आहे. दरवर्षी ग्रामस्थ गावपूजेला नाटक-नमन करतात. गेल्या वेळी करोनामुळे तो कार्यक्रम झाला नाही. लॉकडाउनमध्ये मंडळी घरीच बसली. पण मन काही स्वस्थ बसू देत नव्हते. लोकांच्या मनात विचार आला की नाटक आणि नमन होणार नसेल, तर आपण वेगळे काहीतरी करू. त्यातूनच वेबसिरीज करायचे ठरले. शहरापासून दूर असलेल्या आणि तंत्रज्ञानाशी मोबाइलव्यतिरिक्त कसलीही ओळख नसलेल्या या गावाला वेबसिरीज करणं मोठे आव्हान होते. पण आव्हानापेक्षा जिद्द मोठी होती.

वेबसिरीज करण्यासाठी कथा हवी, लेखक हवा, तंत्रज्ञ हवे. कलाकार तर अख्खे गावच होते. गावकर्यां ची शोधमोहीम सुरू झाली. त्यात संगमेश्वरी बोलीभाषेच्या प्रांतात कलाक्षेत्रातील नवोदित आणि गावातल्या कलावंतांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे स्वामी समर्थ प्रॉडक्शन उभे राहिले. यापूर्वी समर्थ प्रॉडक्शनने ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याद्वारे आणि ‘अकरित झो मरनाच्या भायर बेफाट’ या वेबसिरीजमुळे लोकमान्यता मिळविली आहे. त्या संस्थेने चाटवळवाडीच्या लोकांच्या हौसेला सहकार्य केले. त्यातून वेबसिरीज साकारली आहे.

‘रानभूल’ हा कोकणात रहस्यमय घडणार्यास एका घटनेचा पाठलाग आहे. रत्नागिरीत सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरलेला बिबट्या गावात येतो आणि कथेला प्रारंभ होतो. लहान मुलांपासून साठी ओलांडलेल्या, कमरेला आकडी-कोयती बांधणाऱ्या आजोबांपर्यंत सारे त्यात हौसेने सहभागी झाले. अनिल गोनबरे, राजू गोनबरे, रमेश गोनबरे, विवेक मुंडेकर, चैतन्य मुंडेकर, सुनील किंजळे यांनी त्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना चित्ररूप आणण्यासाठी अभिनेते आणि संगमेश्वरी बोलीतील सिद्धहस्त कवी सचिन काळे आणि गायक अभिनेते सुनील बेंडखळे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

सुभाष मुंडेकर हे या वेबसिरीजचे निर्मिाते आहेत. दिग्दर्शन सचिन काळे यांनी केले आहे. संगीत गणेश घाणेकर यांनी दिले आहे. प्रकाशयोजना शेखर मुळे यांची आहे. छायाचित्रण प्रसाद पिळणकर व पंकज गोवळकर यांनी केले आहे. संकलन मयूर दळी, तर पब्लिसिटी मंगेश मोरे करत आहेत. वेबसिरीजचे क्रिएटिव्ह हेड सुनील बेंडखळे आहेत. रानभूलचे कथा/पटकथा/संवाद संगमेश्वरी बोलीतील लेखक अमोल पालये यांचे आहेत. लवकरच येणाऱ्या या यूट्यूबवरील वेबसिरीजचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply