करोनानंतरच्या काळात रस्ते, पर्यटनासाठी अधिक निधी – पालकमंत्री

रत्नागिरी : करोनाच्या काळात नियोजनाचा निधी प्राधान्याने करोनासाठी खर्च झाला. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण निधी देऊन रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील. त्यात रस्ते आणि पर्यटनाला अधिक असेल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पार पडला. ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, करोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करू. करोना महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली, अशा सर्वांचा मी या प्रसंगी आवर्जून उल्लेख करतो. आता लसीकरण सुरु झाले आहे. त्याची व्यवस्थित आखणी व नियोजन करण्यात आलेले आहे. करोना संपलेला नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवून मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री पुढेही जारी ठेवावी. करोना काळात जिल्ह्यात विषाणू प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. शासन नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर आणि खंबीर आहे, हे शासनाने दाखवून दिले आहे. करोना काळात लॉकडाउन दरम्यान शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळीच्या उपक्रमातून ज्यांना भोजन मिळणे शक्य नव्हते त्यांच्यासह हजारो परप्रांतीयांना मोठा आसरा मिळाला.

याच काळात महात्मा जोतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनाराबवून शासनाने शेतकऱ्यांनाही मदत केली, असे सांगून श्री. परब म्हणाले की, पत्तीमध्ये आपत्ती ठरलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना सर्वाधिक बसला. त्याप्रसंगी शासनाने १७६ कोटींची तातडीची मदत दिली.‍ विविध संकटात नुकसान झालेल्या मच्छीमारांसाठीदेखील ६० कोटींचे पॅकेज शासनाने मदत म्हणून दिले. लॉकडाउन आणि हापूस हंगाम एकाच वेळी आला. त्यात बागायतदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी ग्राहकांच्या दारापर्यंत हापूस पोहोचवणे आणि काजू उत्पादकांना वस्तू तसेच सेवा करातील राज्याचा पूर्ण हिस्सा अनुदानरूपात देऊन प्रक्रिया उद्योगाला उभारणी देणे, कृषीपंप स्वखर्चाने लावणाऱ्या शेतकऱ्यांना बिलातून परतावा देणे आदी विविध कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या सागरी किनाऱ्यांचा विकास करून आगामी काळात हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे, असे सांगून श्री. परब यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी पोलीस दल तसेच इतर पथकांनी मानवंदना दिली. शीघ्र कृती दलाचे एक प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण आज करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते करोनाच्या काळात उत्कृष्ट काम करणारे कोविड योद्धे, गुणवंत विद्यार्थी, गुणवंत खेळाडू, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे तसेच दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड उपस्थित होते.
…….
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेश कळंबटे यांना प्रदान


पत्रकार राजेश कळंबटे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार यावेळी देण्यात आला. गेली १५ वर्षे ते पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेत असूनही त्यांनी खो-खो या खेळाशी आपली नाळ जोडून ठेवली. खो-खो खेळात युवा पिढीला वाव मिळावा यासाठी ते मोठी मेहनत घेत आहेत. खो-खो पंच म्हणून त्यांनी राज्यस्तरावर आपली छाप पाडली. त्यांच्या कामाची दखल शासनाच्या क्रीडा विभागाने घेऊन त्यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर केला. तो आज प्रदान करण्यात आला.

पालकमंत्र्यांची आरएसएसच्या पद्धतीने मानवंदना

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीताच्या साथीने राष्ट्रध्वजाला हात विशिष्ट पद्धतीने डोक्याजवळ नेऊन मानवंदना दिली जाते. रत्नागिरीतील आजच्या कार्यक्रमाच्या वेळी पालक मंत्री ॲड. अनिल परब यांनी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीने हात छातीशी आडवा धरून ध्वजाला वंदन केले. तो एक कुतूहलाचा विषय ठरला.
…..

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची झलक सोबतच्या व्हिडीओमध्ये –

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply