आयकर, जीएसटीमधील जाचक तरतुदी सुधारण्यासाठी व्यापारी, करसल्लागारांचे आंदोलन

रत्नागिरी : जीएसटी, आयकर कायद्याच्या पूर्ततेच्या तरतुदी कमी आणि सुसह्य कराव्यात, अशी मागणी करत आज देशभरातील व्यापारी, उद्योजक, करसल्लागार संघटनांनी जीएसटी आणि आयकर विभागांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत निवेदन दिले. रत्नागिरीतही व्यापारी आणि करसल्लागार आंदोलनात सहभागी झाले.

कर चुकविणाऱ्यांना आयकर खात्याला जेरबंद करता येत नाही. त्यामुळे दरवर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. हा भार सहनशक्तीच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे आयकर व जीएसटी प्रशासनाविषयी कर व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. देशभरामध्ये सर्वत्र १३२ संघटनांनी मिळून आज आंदोलन केले.

करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष अभिजित बेर्डे, उपाध्यक्ष वरदराज पंडित, सचिव राजेश गांगण, खजिनदार उज्ज्वल बापट, कमिटी मेंबर मंदार गाडगीळ, भैय्या भिंगार्डे, रमाकांत पाथरे, दिनकर माळी, मंदार देवल, अभिजित पटवर्धन, हॉटेल असोसिएशनतर्फे उदय लोध, सुनीलदत्त देसाई, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे, सुहासभाऊ पटवर्धन, गौरांग आगाशे, श्री. भिंगार्डे, क्रेडाईचे संतोष तावडे, नित्यानंद भुते, मुकेश गुंदेचा, केमिस्ट संघटना, ग्राहक वस्तू वितरण संघ यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. उदय पेठे, उदय लोध, अभिजित बेर्डे, नित्यानंद भुते यांनी मनोगत व्यक्त केले.

काय आहे अडचणींचे स्वरूप?

भारतातील सर्व व्यापारी, उद्योजक व्यापाराबरोबरच खरेदी-विक्री, वसुली, कर्ज, हिशोब, कर कायदे यांची पूर्तता ऑनलाइन करण्यासंदर्भात योग्य माहिती मिळत नाही. गेल्या पाच वर्षांत कर कायद्याखालील अनेक तरतुदी जाचक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे विविध पूर्तता करताना दमछाक होते. सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती जीएसटी पोर्टलवरील तक्त्यानुसार दरमहा ठरावीक तारखेपूर्वी अपलोड करावी लागते. अंतिम तारखेला सुट्टी असली तरी काम करावे लागते. त्यानुसार पोर्टलवर उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिट हिशेब पुस्तकाशी जुळतो का, हे तपासावे लागते. पुरवठादारांनी माहिती भरली नसेल तर त्यांच्या मागे लागावे लागते. आवक जावक आणि उपलब्ध क्रेडिटनुसार रिटर्न आणि करभरणा, कुठले क्रेडिट मिळाले व कुठले नाही याचा हिशोब ठेवून पडताळणी करावी लागते. कॅश लेजर, क्रेडिट लेजर, अव्हेलेबल, युटीलाइज्ड क्रेडिट अजूनही नक्की समजत नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.

विक्री केली असो वा नसो, माल दुसरीकडे पाठवताना ई-वे बिल काढावे लागते. त्यात चूक झाली तर मोठा भुर्दंड पडतो. कोणालाही बिलाचे, कामाचे पैसे देताना टीडीएस पाहावा लागतो, किती टक्के कापायचे हे नेमके माहीत नसते. काही व्यवहारांना टीसीएस लागू होते, त्याची माहिती वेगळी ठेवावी लागते. दर महिन्याला ७ तारखेपूर्वी टीडीएस, टीसीएसचे पैसे भरावे लागतात. त्याचा वेगळा हिशेब ठेवावा लागतो. दर तीन महिन्यांनी रिटर्न भरायचे, प्रत्येकाला १६ क्रमांकाचा फॉर्म द्यायचा. हे सारे वेळकाढू काम आहे. वर्षअखेरीस हिशोब पुस्तके, जीसटी रिटर्न याचा ताळमेळ घालावा लागतो, यामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे.

आयकर, टीडीएस, जीएसटी त्यातील इनपुट क्रेडिटची परिपूर्ण माहिती असणारा हिशेबनीस नसतो. त्यामुळे सल्लागारांची मदत घ्यावी लागते. प्रत्येक कायद्याचे तज्ज्ञ वेगळे असतात. त्यांची मते वेगवेगळी असतात. नक्की काय करायचे समजत नाही. करकायद्यात पूर्वसूचना न देता सतत काही ना काही बदल केले जातात. अर्ज बदलले जातात. त्याचा मागोवा ठेवावा लागतो. चूक झाली तर जीसटी रिटर्न दुरुस्त करता येत नाही. आयकर, टीडीएस, जीएसटीची स्वत: दाखल केलेली आणि पुरवठादार आणि ग्राहक यांनी दाखल केलेली माहिती यात फरक असेल तर त्याच्या नोटिसा येतात. किचकट तरतुदी लक्षात घेता कर सल्लागारांची मदत घ्यावीच लागते. तेही अर्धशिक्षित असिस्टंट, क्लार्क, आर्टिकल यांच्यावर अवलंबून असतात.

ई-वे बिल बंद करणे, इनपुट क्रेडिट रोखणे, नोंदणी रद्द करणे असे अधिकार दिल्याने यापुढे त्रास वाढणार आहे. त्यामुळे करकायद्यात सुसह्य सुधारणा कराव्यात, अशी एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली.

हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधात नसून करकायद्यातील सुधारणांसाठी आहे, असे करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष अभिजित बेर्डे यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या जीएसटी कार्यालय, आयकर कार्यालयातील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. आयकर अधिकारी अजयकुमार मीना, अधीक्षक सुदेश शिवलकर आणि विक्रीकर उपायुक्त सुनील कानगुडे यांनी संघटनांतर्फे निवेदन स्वीकारले. हे निवेदन वरिष्ठांकडे पाठवू तसेच आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वानसन त्यांनी दिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply