स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीत मासिक प्रवचनमाला; ३०, ३१ जानेवारीला देवदत्त परुळेकरांचे प्रवचन

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने मासिक व्याख्यान/प्रवचनमालेचा उपक्रम ३० जानेवारीपासून रत्नागिरीत सुरू होत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला दोन व्याख्याने किंवा प्रवचने आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील देवदत्त परुळेकर यांच्या प्रवचनांनी केला जाणार आहे.
शनिवार-रविवारी (३० व ३१ जानेवारी २०२१) सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत रत्नागिरी शहरातील वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात ही प्रवचने होणार आहेत. नामाने केलेली सामाजिक क्रांती हा परुळेकर यांच्या प्रवचनांचा विषय आहे.

देवदत्त परुळेकर

देवदत्त परुळेकर यांचा परिचय :

एक तरी ओवी अनुभवावी, तुका म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, विठोची लेकरे, भक्तीचा मळा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी अनेक पुस्तके श्री. परुळेकर यांनी लिहिली असून, त्या पुस्तकांचे अनेक मान्यवरांकडून कौतुक झाले आहे. तसेच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांचे पाच हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणचे ते अध्यक्ष असून, वेंगुर्ल्यातील मुक्तांगण संस्थेचे संचालक आहेत. त्याशिवाय वेंगुर्ला येथील संत विचार अभ्यास मंडळ (अध्यक्ष), वेंगुर्ला नगर वाचनालय (उपाध्यक्ष), सिंधुदुर्ग हिंदी प्रचार सभा (कार्याध्यक्ष) अशा अनेक संस्थांचेही ते पदाधिकारी आहेत. वै. मामा दांडेकर दिंडीचे ते प्रमुख संचालक असून, त्यांनी अनेक व्याख्याने, प्रवचने, वारकरी कीर्तने केली आहेत.

नुकतीच कीर्तनालंकार पदवी मिळवलेल्या सौ. विशाखा भिडे यांचा ३० जानेवारीच्या कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे, असे मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply