कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमाचे ७ फेब्रुवारीला आयोजन

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशनतर्फे येत्या रविवारी (७ फेब्रुवारी) कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मालवण बंदराच्या पश्चिमेला कुरटे बेटावरील छत्रपती शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची उभारणी केली. त्याकाळी तब्बल एक कोटी होन खर्च झाले होतो. ४८ एकर क्षेत्रातील हा जलदुर्ग अजूनही अभेद्य आहे. देशविदेशातून लाखो पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात.

मालवण शहरातील या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याची पडझड होत आहे. त्याच्या डागडुजीचा विषय शासकीय पातळीवर हाताळला जात आहे. मात्र किल्ल्याला भेट देणारे अनेक पर्यटकही किल्ल्यावर कचरा टाकून किल्ला विद्रूप करतात. शिवप्रेमी वारंवार त्याची स्वच्छता करतात. किल्ल्यावर कचराकुंडी किंवा कचरा साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्लास्टिक बाटल्या, पिशव्या सर्वत्र पसरलेल्या आहेत.

किल्ल्यावरील हा कचरा वाहून नेणे तसेच वाढलेले गवत काढण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशनने येत्या रविवारी जिल्ह्यातील शिवप्रेमी सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कचरामुक्त सिंधुदुर्ग किल्ला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि स्थानिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, सचिव प्रा. एस. एन. पाटील आणि शिवप्रेमी सिंधुदुर्गचे रमाकांत नाईक यांनी केले आहे.

किल्ल्यावरील स्वच्छतेचा कार्यक्रम ७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुरू होईल. तो सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. महाविद्यालयीन मोजक्या विद्यार्थ्यांना किल्ल्यावरील ये-जा करण्यासाठी मोफत प्रवास असेल. सर्वांनी स्वतःचा डबा आणि पाण्याची व्यवस्था स्वतःच करायची आहे. तसेच सर्व सूचना वा नियमांचे पालन आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी शिवप्रेमी सिंधुदुर्गचे रमाकांत नाईक यांच्याशी ८०८७८७०६८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply