रत्नागिरी : स्वच्छ रत्नागिरी अभियानाला गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणजे मांडवी येथून आज सुरुवात झाली.
मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी अलीकडेच रत्नागिरीचे आरोग्य सभापती निमेश नायर यांची भेट घेऊन रत्नागिरीतील विविध आरोग्य समस्यांवर चर्चा केली. त्याचवेळी श्री. नायर यांनी ५ फेब्रुवारीपासून स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आज श्री. नायर पालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबत मांडवी समुद्रकिनाऱ्यावर हजर झाले.
मांडवी पर्यटन संस्थेने आवाहन केल्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आणि कारुण्य मरीन एक्स्पोर्टचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत मांडवी पर्यटन संस्थेचे पदाधिकारी आणि मांडवी ग्रामस्थ, समुद्रावर भेळ विक्री करणारे व्यवसायिक या स्वच्छता अभियानात सहाभागी झाले. सुमारे दोनशे नागरिकांनी संपूर्ण मांडवी समुद्रकिनारा दोन तासांत स्वच्छ केला. हॉटेल सी फॅनच्या वतीने अभियानात सहभागी नागरिकांना चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मांडवी येथील मिलिंद शिवलकर यांनी अभियान संपल्यानंतर सर्वांना अल्पोपाहाराचे वाटप केले.
अभियानाद्वारे सुमारे ३ डंपर जमा झालेला कचरा पालिकेचे आरोग्य अधिकारी श्री. सावर, श्री. कांबळे यांच्या पथकाने तात्काळ उचलला. मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्या वतीने आरोग्य सभापती निमेश नायर यांचे आभार मानण्यात आले.
समुद्रकिनाऱ्यावर येणारे सांडपाणी, पऱ्या-नाले येथे बसविण्यात येणारे सांडपाणी प्रकल्प, पार्किंग व्यवस्था, ८० फुटी हायवेवरील रस्त्यावर वाहणाऱ्या गटाराचे काम तातडीने सुरू करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती निमेश नायर, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक बंटी कीर, नगरसेवक नितीन तळेकर, नगरसेविका सौ. दया चवंडे, अल्ट्राटेक कंपनीचे डी. एस. चंद्रशेखर, नीरज खरे, अनिल पुराणिक, भूषण डहाणूकर, संतोष पाटील, अनिल त्रिपाठी, सुहास ठाकूरदेसाई, राजू भाटलेकर, सुरेश पावसकर, रोहित मायनाक, हर्ष दुडे, श्रेयस कीर, बंड्या सुर्वे, बिपिन शिवलकर, नरेश शिवलकर, संदीप तोडणकर, सौ. विद्या वायंगणकर, सौ. छाया मोरे, श्वेता धनावडे, समीर शिवलकर, सौ. रसिका शिवलकर आदी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
