`राधाकृष्ण`च्या रौप्यमहोत्सवाची पहिली घंटा शनिवारी वाजणार

पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक जीवनपटाचा परामर्ष घेणारा ‘रंध्रात पेरली’ कार्यक्रम

रत्नागिरी : येथील राधाकृष्ण कलामंचने संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त यावर्षी विविध उपक्रम पार पडणार आहेत. त्यात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक जीवनपटाचा परामर्ष घेणारा ‘रंध्रात पेरली’ हा पहिला कार्यक्रम येत्या शनिवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे.

शासनाचे करोनाविषयक नियम पाळून हा येत्या शनिवारी रौप्यमहोत्सवातील पहिला कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी नाट्यगृहात जंतुनाशक फवारणी केली आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध ज्येष्ठ गायक राजाभाऊ शेंबेकर गायन करणार असून त्यांना हेरंब जोगळेकर, वरद सोहोनी, हरेश केळकर वाद्यसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन धनंजय चितळे करणार आहेत. वर्षभर नावीन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने स्वतःचे स्थान अढळ ठेवणाऱ्या राधाकृष्ण कलामंच या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. संस्थेची स्थापना १९९६ मध्ये झाली असली तरी संस्थेचा पाया त्याआधी १९८० साली राधाकृष्ण मंदिरात राधाकृष्ण वैश्य संस्थेच्या प्रोत्साहनाने घातला गेला. भालबा केळकर यांच्या विचारांनी आणि संस्कारांनी भारलेल्या प्रा. विजयकुमार रानडे यांनी या नाट्यसंस्कारांची मुहूर्तमेढ रोवली. सरांनी मुलांमध्ये नावीन्यपूर्ण विचार करण्याची प्रक्रिया, नाट्यविषयक नवनवे आयाम, दृष्टी, सजगता, कल्पनाशक्तीचा विकास अशा अनेक मूल्यांचे रोपण केले. त्या जोरावर छोटेमोठे रंगमंचीय आविष्कार राधाकृष्ण मंदिराच्या रंगमंचावर साकारत गेले. संस्थेची स्थापना १९९६ साली राधाकृष्ण कलामंच अशा स्वतंत्र अस्तित्वाने हा नाट्याभ्यासी ग्रुप रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात उभा राहिला.

संस्था विविध एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करू लागला. चटाटो, निवडुंग, वाडा विकायचाय, छू मंतर, टूर-टूर, समांतर, चाहूल, सेतू असे अनेक गद्य रंगमंचीय आविष्कार साकारून गद्य रंगभूमीचे कलाकार अशी आपली ओळख रसिकांचे मनावर ठसवण्यात कलामंच सातत्याने यशस्वी होत मोठा होत होता. विविध नाट्यस्पर्धा जिंकत होता. गद्य नाट्यकृतीबरोबरच कलामंचने संगीत रंगभूमीवरही आपला दमदार ठसा उमटवला. पंडितराज जगन्नाथ आणि मंदारमाला या नाटकांनी राज्य नाट्यस्पर्धेबरोबर दिल्लीतील बृहन्महाराष्ट्र संगीत नाट्यस्पर्धा गाजवून बक्षिसांची लयलूट केली. ययाति देवयानी, स्वयंवर, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी, संत गोरा कुंभार या दर्जेदार कलाकृती सादर करून रत्नागिरीसह अवघ्या महाराष्ट्रातील चोखंदळ रसिकांच्या मनात प्रेमाचे, आदराचे, अढळ स्थान निर्माण केले आहे.

नाट्यनिर्मिती, एकांकिका निर्मितीवर न थांबता सुमारे ११ वर्षे पाऊलखुणा या नावाने अभिजात शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या मुलांच्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करून भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत व त्याचा वारसा जपण्याचे काम केले आहे. गीतरामायण, राम रंग शाम संग, स्मृति ठेवूनी जाती, अभंगरंग, गाणारे व्हायोलीन, रसिक मनोहर विद्याधर, कभी तनहाई यों मे…. (संगीतकार स्नेहल भाटकर स्मृती) असे आगळेवेगळे विषय घेऊन सुरेल वाद्यवृंदाचे रंगमंचीय आविष्कार सादर करून रसिकांची कायमस्वरूपी जिंकण्याचे कसब राधाकृष्ण कलामंचने साधले आहे.

रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून काही उपक्रम रसिकांसाठी वर्षभर आयोजित करण्याचा मानस आहे. कार्यक्रमांसाठी रसिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि कलामंचवरील आपला स्नेह दृढ करावा, असे आवाहन राधाकृष्ण कलामंचच्या वतीने करण्यात आले आहे.

राधाकृष्ण कलामंचचे अध्यक्ष विनीत घाणेकर, सचिव मोहन बापट, सहसचिव मिलिंद टिकेकर, खजिनदार विनायक जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी आनंद पाटणकर, महेंद्र पाटणकर आणि प्रशांत साखळकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका १५० आणि १०० रुपयांच्या असून त्या स्वा. सावरकर नाट्यगृहात उपलब्ध होणार आहेत. पन्नास टक्के आसनक्षमतेमध्ये कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply