विहिरीत पडलेल्या रानगव्याची कावळ्याच्या युक्तीने सुटका

राजापूर : लहान मुलांना सांगितली जाणारी कावळ्याच्या युक्तीची गोष्ट सगळ्यांनाच माहीत असेल. तहान लागलेल्या कावळ्याला पाण्याने अर्धे भरलेले मडके दिसते. तो मडक्याच्या काठावर उभा राहून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण मडक्यातल्या पाण्यापर्यंत त्याची चोच पोहोचत नाही. तेव्हा तो आजूबाजूचे खडे मडक्यात टाकतो. पाणी वर येते. पाणी पिऊन तो तहान भागवून निघून जातो. या गोष्टीतील कावळ्याची युक्ती वापरून राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या एका रानगव्याची सुटका ग्रामस्थांनी केली.

भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्या विहिरीत पडल्याच्या बातम्या येतात. मात्र अंदाज न आल्याने बुधवारी (१० फेब्रुवारी) रात्री आंगले (ता. राजापूर) येथील पडक्या विहिरीत रानगवा पडला. लोकवस्तीपासून सुमारे दोन किमी दूर अंतरावर सुमारे पंधरा फूट खोलीची ही पडकी विहीर आहे. विहिरीत सुमारे तीन फूट पाणी आहे. या विहिरीच्या जवळून जाणार्याक काही ग्रामस्थांना विहिरीतून आवाज आला. सुरुवातीला म्हैस किंवा रेडा विहिरीत पडल्याचा त्यांचा कयास होता. विहिरीच्या जवळ जाऊन निरखून पाहिल्यानंतर म्हशीऐवजी तेथे रानगवा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच योगेश प्रभुलकर यांनी वन विभागाशी तत्काळ संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, चिपळूणचे रामदास खोत, वि. द. झाडे, राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी, रत्नागिरीच्या परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड, दीपक खाडे इत्यादी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ ससाळे गावाजवळच्या आंगले या गावात घटनास्थळी दाखल झाले.

रानगवा पडलेली विहीर लोकवस्तीपासून दूर असल्याने आणि रात्र झाल्याने काळोखात रानगव्याला बाहेर काढणे मोठे आव्हानाचे होते. विहिरीचा परिसर दाट जंगलाचा असल्याने तेथे जेसीबी नेणेही शक्य नव्हते. अशा स्थितीतही जेसीबी मागविण्यात आला होता. तो विहिरीच्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागणार होता. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने विहीर एका बाजूने खोदून रानगव्याला बाहेर येण्यासाठी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने काम सुरू झाले. पण आक्रमक झालेला रानगवा खोदकाम करणाऱ्यांच्या अंगावर चाल करण्याचा प्रयत्न करत होता. पण थोड्याच वेळेत मार्ग तयार झाला. मात्र विहिरीत पाणी असल्याने रानगव्याला बाहेर येणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत काय करावे, हे ग्रामस्थांना समजत नव्हते.

तेवढ्यातच कोणाला तरी युक्ती सुचली. आजूबाजूचे दगड विहिरीत टाकले, तर पाण्याची पातळी वाढेल, रानगव्याला उभे राहायलाही मदत होईल, असा विचार पुढे आला. त्याची अंमलबजावणी झाली. विहिरीतल पाणी वर आले. मुलांच्या गोष्टीतील युक्ती अशी कामी आली. आता बाहेर पडणे शक्य असल्याचे लक्षात येताच रानगवा पाण्यातून खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या मुखापर्यंत आला आणि त्या मार्गाने धावत बाहेर येत त्याने जंगलात धूम ठोकली.

वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने रात्रीच्या काळोखात विहिरीमध्ये पडलेल्या रानगव्याची त्यातून सुखरूप सुटका करीत जीवदान दिले. ग्रामपंचायत सदस्य योगेश प्रभुलकर, ग्रामस्थ आयूब मीर, बाळा लाड आदींनी त्यासाठी सक्रिय मदत केली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply