लोकमान्य टिळक अजूनही बंदिवासात….

करोनाप्रतिबंधक लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मुंबईमधील लोकल सुरू झाली, राणीच्या बागेत आबालवृद्ध प्राणी-पक्षी दर्शन घेऊ लागले. हॉटेल्स सुरू झाली. सिनेमागृहे सुरू झाली. नाट्यगृह सुरू झाले. देवस्थानांची गर्दी पेपरमध्ये फोटोसकट छापून येऊ लागली. समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. पर्यटकांना सर्व सोयीसुविधा (बारसहित) सुरू झाल्या. पर्यटन परिषदा झाल्या. कोकणात असे करणार, तसे करणार, पर्यटनाचा विकास जलदगतीने होणार, अशा पर्यटनासाठी आकर्षक घोषणाही करण्यात आल्या.

… पण आम्हा रत्नागिरीकरांना लाज वाटते सांगायला, लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षामध्ये आजही समस्त पर्यटक ज्या आदराच्या भावनेने रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात, ते रोज टिळक जन्मस्थान बंद असल्याची पाटी पाहून गेटाबाहेरून शरीर वेडे-वाकडे करीत आणि फोटो व्यवस्थित येण्यासाठी तोल सांभाळत फोटो घेऊन जात आहेत हे आम्ही दररोज पाहत आहोत.

टिळक जन्मभूमी पर्यटकांना खुली करण्याबाबत अनेकांनी अनेकदा सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. पण अद्यापही स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष महोदय आणि त्याचबरोबर पुरातत्त्व विभागाला जाग आलेली नाही, हे रत्नागिरीकरांचे दुर्दैव आहे.

खरे तर आता शाळांच्या सहली बंद आहेत. त्यामुळे पर्यटक झुंडीने येत नाहीत. जे येतात ते केवळ लोकमान्यांचे इतिहासातील महत्त्व जाणणारे येतात आणि त्यांची संख्या कमी असते. त्यामुळे टिळक जन्मस्थानाजवळ करोनाविषयी घेण्याच्या काळजीचा इतरत्र उडतो आहे तसा फज्जा उडण्याचीही शक्यता नाही. सर्व प्रकारची काळजी घेणेही अशक्य नाही.
तरीही लोकमान्य टिळक अद्यापही जन्मस्थानामध्ये बंदिवासातच आहेत, ते केवळ पुरातत्त्व खात्याच्या कोणत्या हट्टापायी बरे? पुरातत्त्व खात्याच्या अधिकारीवर्गाच्या डोळ्यावर कुण्या राजकारण्यांनी तर पट्टी बांधली नाही ना?

ते काहीही असो, स्वातंत्र्यपूर्व काळात बंदिवास भोगलेल्या टिळकांच्या पुतळ्याचाही बंदिवास अजून संपलेला नाही!

  • ॲड. धनंजय जगन्नाथ भावे, रत्नागिरी
    (९४२२०५२३३०)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply