ठाणे : समाजव्यवस्था सुरळित चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असून सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरूप इतक्या सुंदर पद्धतीने आणि कुशलतेने रेखाटले आहे की, त्याचा उपयोग निश्चितच संदर्भग्रंथ म्हणून होईल, अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी. डी. कुलकर्णी यांनी शुभसंदेशाद्वारे व्यक्त केल्या.
कोकण इतिहास परिषद, श्रीकृपा प्रकाशन आणि ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित “गावगाडा – प्राचीन ते अर्वाचीन” या पुस्तकाचा जाहीर प्रकाशन समारंभ कोव्हिडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. फेसबुक लाइव्हद्वारे पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन निवडक उपस्थितीत झाला. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, लेखक सदाशिव टेटविलकर, कोकण इतिहास परिषदेच्या प्रवक्त्या डॉ. विद्या गाडगीळ आणि प्रकाशक विश्वनाथ साळवी उपस्थित होते. इतिहास संशोधक डॉ. बी. डी. कुलकर्णी यांच्याबरोबरच महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या शुभसंदेशांचे वाचन यावेळी करण्यात आले.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुभसंदेशाद्वारे सदाशिव टेटविलकर समर्पित भावनेने करीत असलेल्या इतिहास संशोधनकार्याची प्रशंसा केली. गावगाडा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हरवलेल्या संस्कृतीची माहिती नव्या पिढीला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुस्तकाला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. शहरांची महानगरे झाली असली तरी गावगाड्यासारख्या मुळांच्या जोरावरच आपली संस्कृती आणि इतिहास जपला जातो, आपले माणूसपण घडत असते, असे त्यांनी म्हटले आहे. इतिहासाचे भान देण्याचे काम सदाशिव टेटविलकर आपल्या विविध साहित्यसंपदेतून करीत असून या पुस्तकातील संदर्भ माझ्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याला कामात उपयोगी पडू शकतात. स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासकांनाही या पुस्तकाचा उपयोग होईल. समतोल पद्धतीने इतिहास सांगणारे इतिहासकार म्हणून सदाशिव टेटविलकर यांची नोंद ठाण्याच्या इतिहासाला घ्यावीच लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.
ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी या पुस्तकाद्वारे इतिहासाचे व समाजजीवनाचे नवे दालन अभ्यासकांसाठी खुले झाले असल्याचे सांगत ग्रंथसंग्रहालयातील ऐतिहासिक पुस्तकांचा विभाग समृद्ध करण्यासाठी टेटविलकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. करोनाच्या काळाने खूप काही शिकविले असून यापुढील काळात अधिक जोमाने लिखाण करण्याची उमेद श्री. टेटविलकर यांनी व्यक्त केली.
(संपर्क ९७६९४२८३०६)

