रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिने मोफत वाचनालय

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात येत्या १५ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत दोन महिन्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

लॉकडाउन कालावधीत शाळा-महाविद्यालयांचे कामकाज बंद असताना वाचनालयांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

मोफत वाचनालय सुविधेमध्ये एक पुस्तक घरी घेऊन जाऊन वाचता येईल. वाचनालयात येऊन वाचनालयाचे अर्ज भरून, तसेच आय-कार्डची झेरॉक्स आणि मूळ प्रत, पालकाचे आधार कार्ड, एका त्रयस्थ मान्यवर व्यक्तीचे शिफारसपत्र आणि ३०० रुपये अनामत (ही रक्कम १५ जून रोजी पुस्तक जमा करून परत मिळेल.) या पूर्तता करून या सुविधेचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतील.

वाचनालयात विपुल आणि विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांचे वाचन करण्याची संधी विद्यार्थ्यांनी घ्यावी. अनेक चरित्रे, प्रवासवर्णने, ऐतिहासिक कादंबऱ्या, ललितलेख, कथासंग्रह, भयकथा, शौर्य कथा, कविता संग्रह, तसेच स्वामी, श्रीमान योगी, छावा, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, हॅरी पॉटर, जेम्स बॉण्ड यांची पुस्तके अशी अनेक प्रकारची नवी-जुनी पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घ्यावा, यासाठी मोफत वाचन सुविधा उपलब्ध केली आहे असे अॅड. पटवर्धन म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्वांत जुने म्हणजे १९३ वर्षांचे हे वाचनालय रत्नागिरीत आहेय तेथील प्रचंड ग्रंथखजिना आणि अनेक दुर्मिळ पुस्तके विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. वाचनालय रविवारव्यतिरिक्त सकाळी ९ ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ३.३० ते ७.१५ या वेळेत वाचकांसाठी खुले असते. विद्यार्थ्यांनी वाचनालयाच्या या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा. पालकांनीही जागृतपणे विद्यार्थ्यांना रत्नागिरीतील या वाचन मंदिरात जाण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply