शिस्त पाळल्यास करोना लवकर हरेल : डॉ. श्रीधर ठाकूर

रत्नागिरी : करोनाच्या प्रतिबंधासाठी नियमित मास्कचा वापर, कोणाच्याही जास्त संपर्कात न राहणे आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचा शिस्तीने वापर केल्यास करोनाला लवकर हरेल. त्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळित होतील, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.

डॉ. ठाकूर म्हणाले, शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम चांगल्या रीतीने आखली. त्याच पद्धतीने ‘माझा समाज, माझी जबाबदारी’ हे भान ठेवून प्रत्येकाने वावरले पाहिजे. रत्नागिरी जिल्हा दुर्गम असल्यामुळे येथे अजून मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा रुग्णांना बाहेर जावे लागते. करोनाचे संकट टाळणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. करोना काळात जिल्हा आरोग्य यंत्रणा, रुग्णालयांनी चांगली कामगिरी केली, असे सांगून डॉ. ठाकूर म्हणाले, शासनाने सुरवातीला ६० वर्षांवरील आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू केले आहे. परंतु लस घेतली म्हणून लोकांनी बेफिकिरीने वागू नये. कारण करोनाशी लढा देणार्याी अँटिबॉडी तयार होण्यास ६ ते ८ आठवडे लागतात. सर्वांनीच पुरेशी काळजी घेतली पाहिजे. मास्क लावणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखल्यास करोनाचे संकट आपण लवकरच परतवून लावू.

डॉ. ठाकूर म्हणाले, करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लहान मुलांना बाधा होऊ लागली आहे. त्यांच्या माध्यमातून अन्य लहान मुले आणि घरातील मोठ्यांनाही करोनाचा धोका आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी घरातच खेळा, पुरेशी काळजी घ्या, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले.

गतवर्षी करोना आल्यावर नेमकी कशी काळजी घ्यावी, करोनाला दूर कसे ठेवावे, या संदर्भात सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडिओ शेअर केले होते. आताही महाराष्ट्रात करोना वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा हे आणि नवीन व्हिडीओद्वारे जनजागृती करणार असल्याचे डॉ. ठाकूर म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply