सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात २०० हून अधिक करोनाबाधित, सात जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २०० हून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. आज (११ एप्रिल) नवे २१४ रुग्ण आढळले, तर १६६ रुग्ण करोनामुक्त झाले. सात जणांचा मृत्यू झाला.

आजही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक ५८ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील, तर त्याखालोखाल ५३ रुग्ण चिपळूण तालुक्यातील आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ४९, दापोली ३, खेड १८, गुहागर १५, चिपळूण ४२, संगमेश्वर १५, लांजा ६, राजापूर ११ (एकूण १५९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ९, दापोली ६, खेड ७, गुहागर २, चिपळूण ११, संगमेश्वर १५ आणि लांजा ५. (एकूण ५५) (दोन्ही मिळून २१४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार ७३३ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९२० आहे. त्यातील सर्वाधिक १३५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३७९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १६६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार ५० झाली आहे. करोनामुक्तीचा दर आजही पुन्हा कमी झाला असून तो ८६.७८ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७२२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख सहा हजार ५६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात विक्रमी सात जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली. ८ एप्रिलपासून आजपर्यंत मरण पावलेल्यांची नोंद आज करण्यात आली. सर्वांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला आहे. त्यांचा तपशील असा –
८ एप्रिल – चिपळूण, पुरुष (वय ४५), चिपळूण, पुरुष (५५), १० एप्रिल – दापोली, पुरुष (५५), ११ एप्रिल – संगमेश्वर, पुरुष (७३), चिपळूण, पुरुष (६४), गुहागर, महिला (५५), संगमेश्वर, महिला (६६ वर्षे). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३९८ असून मृत्युदर ३.१२ टक्के आहे.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पुन्हा कोविड रुग्णालयात रूपांतरित

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रत्नागिरीचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे.

जिल्हारुग्णालयात पदभरती
दरम्यान, जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली डॉक्टरांची आणि इतर पदांची कमतरता लक्षात घेऊन मानधनावर पदभरती जाहीर करण्यात आली आहे. त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये वर्ग-१, वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. वर्ग- १ साठी एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्याला दरमहा ६० हजार रुपये मानधन दिले जाईल. बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारकांना २८ हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. वर्ग-३ संवर्गातील जीएनएम परिचारिकांना दरमहा २० हजार रुपये, तर एएनएम परिचारिकांना १७ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. स्वच्छता सेवेसाठी वर्ग- ४ या संवर्गातील वॉर्ड बॉयकरिता दररोज ४०० रुपये मानधन दिले जाईल.

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा रुग्णालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply