बारावीची परीक्षा मे महिन्यात, दहावीची जूनमध्ये

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीला, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होईल, असा अंदाज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज घेतलेल्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण होत आहे. शहर आणि ग्रामीण भागातही करोनाचे संक्रमण वाढले आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेतल्यास लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे करोना काळात ही परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी अवघड होऊन बसेल. त्यामुळे बारावीची परीक्षा मेअखेरीस आणि दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. बैठकीवेळी राज्यभरातील शिक्षणसंस्था, लोकप्रतिनिधी आणि अन्य घटकांनी दिलेल्या सूचना आम्ही मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या होत्या. त्यावर विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.”
आजच्या बैठकीत दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक बदलले जावे, अशी चर्चा झाली. राज्यात करोनाचा वाढता आलेख पाहता लॉकडाउनचा निर्णयही प्रलंबित आहे. अशा स्थितीत मुलांच्या परीक्षेबाबत काय होणार, वेळापत्रक नव्याने ठरवले तर तेव्हाच्या परिस्थितीत परीक्षा कशा घ्यायच्या, असे प्रश्न सरकारपुढे उभे आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या काळात करोनाची लागण झाली तर काय होणार, अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दलचे सुतोवाच केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल आणि आरोग्याबद्दल शिक्षण विभाग प्राधान्य देईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. राज्य सरकारपुढे वेळेत निकाल लावणे, अकरावी आणि इतर शाखांमधील प्रवेश हे पुढील काळातील आव्हान असणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांची करोनापासून सुरक्षा हेदेखील प्रमुख लक्ष्य असणार आहे. लवकरच दोन्ही वर्गांच्या नव्या वेळापत्रकांची घोषणा केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply