राजापूरची गंगा आली हो…!

राजापूर : जगात सर्वत्र करोना विषाणूने हाहाकार माजवलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे लॉकडाउनच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी आगमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री २९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा गंगामाईचे आगमन झाले. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगेचा प्रवाह सुरू झाला आहे.

उन्हाळे तीर्थक्षेत्री साधारणपणे दर तीन वर्षांनी गंगामाई अवतीर्ण होते. तसेच, तीन महिन्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते; मात्र २०११पासून दर वर्षी गंगामाईचे आगमन होत आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भक्त गंगामाईच्या दर्शनासाठी येतात; मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गंगा लॉकडाउनच्या काळातच आल्यामुळे भाविकांना तीर्थक्षेत्री जाता येणार नाही.

२०१९मध्ये २० एप्रिल रोजी ती आली होती आणि २४ जून २०१९ रोजी तिचे निर्गमन झाले होते. त्यानंतर १५ एप्रिल २०२० रोजी गंगा आली होती आणि २१ जून २०२० रोजी तिचे निर्गमन झाले होते. त्यानंतर ३१० दिवसांनी उन्हाळे येथे गंगा आली आहे. गंगामाईचे आगमन झाल्याचे आज (३० एप्रिल) उन्हाळे येथील काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. नेमके किती वाजता गंगामाईचे आगमन झाले याबाबत निश्‍चित माहिती नसली, तरी काल रात्री उशिरा गंगामाईचे आगमन झाल्याचा अंदाज गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे यांनी व्यक्त केला.

गंगेचे आगमन झाल्यानंतर तिचा प्रवाह चांगला असून, सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखातूनही सध्या पाणी प्रवाहित होत आहे. गंगामाईचे आगमन आणि निर्गमनाचे कोडे विज्ञानालाही अद्याप सुटलेले नाही. गंगामाईच्या पाण्याने स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविकही गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात; मात्र सध्याही लॉकडाउन सुरू असल्यामुळे यंदाही लोकांची ही संधी हुकण्याचीच शक्यता जास्त आहे. गंगा जास्त दिवस राहिली आणि तोपर्यंत संचारबंदी उठली, तरच कदाचित भाविकांना इथे येता येऊ शकेल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply