करोना चाचण्यांचा प्रभानवल्ली पॅटर्न

करोनाच्या दुसऱ्या लाटेने आता चांगलेच मूळ धरले आहे. शिमगोत्सवामुळे कोकणात आलेल्या चाकरमान्यांमुळे करोनाचा अधिक प्रसार झाला, असे सांगितले जात होते. पण शिमगोत्सव संपून पंधरा-वीस दिवस झाले, तरी दररोज करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणि तो गावागावांत पसरत असल्यामुळे शिमगोत्सवाशी त्याचा काही संबंध नाही, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. पूर्वी शहरी भागात मर्यादित राहिलेला करोना आता ग्रामीण भागात छोट्या छोट्या वाड्या-वस्त्यापर्यंतही जाऊन पोहोचला आहे. करोनाच्या प्राथमिक आणि आरटी-पीसीआरसारख्या मुख्य चाचण्या करणे, वेळेवर रुग्णाचा शोध घेणे आणि त्याच्यावर वेळेवर उपचार करणे हाच त्यातला हाती राहिलेला उपाय आहे.

चाचण्यांची संख्या वाढली, तरी अहवाल मिळायला वेळ लागत आहे. पण ती सारी प्रशासकीय बाब आहे. मुळात चाचण्या करून घेण्याबाबतची जनजागृती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सर्दी, खोकल्यासारख्या किरकोळ गोष्टींसाठीही लोक आता सध्या डॉक्टरांकडे जाणे टाळू लागले आहेत. थोडासा ताप आला तरी आपल्याला करोनाच्या चाचण्या करायला लावतील आणि जिल्हा रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करतील, अशी भीती अनेकांना वाटते. त्यामुळे चाचण्या करायला ग्रामीण भागातील लोक पुढे येत नाहीत, असे चित्र आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर जाणीव-जागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. पण ते शासकीय असल्यामुळे तसे तोकडेच पडतात. अशा वेळी स्वयंस्फूर्तीने पुढे येणे आवश्यक असते. लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली या छोट्याशा गावातील एका तरुणाने हे पुढे येणे म्हणजे नेमके काय आहे, ते दाखवून दिले आहे.

प्रभानवल्ली आणि खोरनिनको ही लांजा तालुक्यातील दोन छोटी एकमेकांच्या शेजारी वसलेली गावे आहेत. या गावातील छोटासा कंत्राटदारीचा व्यवसाय करणारा तरुण जितेंद्र ब्रीद यांनी जिल्ह्यातील आणि सर्वत्रच असलेली करोनाची स्थिती लक्षात घेतली. आपल्या आणि शेजारच्या गावांमध्ये करोना येऊन ठेपला आहे. त्यातून बळी जाण्याची शक्यता आहे, याचा त्याने गांभीर्याने विचार केला. रुग्ण शोधून काढण्यासाठी करोनाची चाचणी अत्यावश्यक आहे. आपल्या गावात तरी लोकांना चाचण्यांना प्रवृत्त केले पाहिजे, असा निर्धार त्यांनी मनाशी केला. त्यातून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना चाचणीचे शिबिर भरविले. वाड्या-वस्त्यांमधील लोकांना तेथे चाचणीसाठी यायला प्रवृत्त केले. लोक चाचणीसाठी तेथे पोहोचतील, अशी व्यवस्था केली. लोकांना करोनाची माहिती दिली. संचारबंदीमुळे इतर ठिकाणी जाण्यायेण्याची वाहतुकीची सर्व साधने बंद असल्यामुळे कोणी गावाबाहेर जाऊ शकत नव्हते. अशा स्थितीत गावातच करोना चाचणी शिबिर भरविल्यामुळे त्याचा फायदा झाला. श्री. ब्रीद यांनी केलेल्या जागृतीमुळे लोकांनी चाचण्या करून घेतल्या. परिणामी तीन-चार हजार लोकवस्तीच्या या दोन गावांमध्ये सुमारे एक टक्का लोकांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार लगेच सुरू करणे शक्य झाले. त्यामुळे तूर्त तरी ही दोन गावे करोनाच्या बाबतीत जागृत झाली आहेत. हीच खरी जागृती आहे. लोकांनीच पुढे आले तर चाचण्यांचे प्रमाण वाढू शकेल. त्यामुळे रुग्णांचा शोध लवकर पूर्ण होईल. त्यांच्यावर वेळेवर उपचार सुरू होतील. प्रसार थांबेल आणि ती करोनामुक्तीची वाटचाल असेल. प्रभानवल्लीचा हा करोना चाचण्यांचा पॅटर्न गावागावांनी अमलात आणला, तर हे शक्य आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ७ मे २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा ७ मेचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply