आश्‍वासक पाचवा स्तंभ

संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात. पहिल्या तीन स्तंभांना वैधानिक अधिकार असतात. चौथ्या स्तंभाला ते नसतात. पण पहिल्या तीन स्तंभांवर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी चौथ्या स्तंभावर असते. अलीकडे हा चौथा स्तंभ काहीसा निष्प्रभ ठरू लागला आहे का, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. म्हणजे या स्तंभाचा प्रभाव अजिबात कमी झालेला नाही. उलट तो मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पण उपयुक्ततेपेक्षा त्याचे उपद्रवमूल्य वाढले आहे, असे फार तर म्हणता येईल. कोणत्या तरी एकाच बाजूची तळी उचलून धरावी, तसे काम हा चौथा स्तंभ करू लागला आहे. त्यामुळे समाजातल्या घटना-घडामोडींकडे, राजकारणाकडे समदृष्टीने पाहण्याची स्वतःची कुवत हा चौथा स्तंभ विसरून गेला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने पाचवा स्तंभ उभा केला आहे. तौते चक्रीवादळाच्या निमित्ताने हा स्तंभ उभारण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले. शासकीय पंचनाम्याची आकडेवारी आणि आपद्ग्रस्तांचे प्रत्यक्षातील नुकसान यामध्ये मोठी तफावत आहे. काही ठिकाणी पंचनामेही झाले नाहीत, अशा तक्रारी आहेत. मुळात पंचनामेच झाले नसतील किंवा तुटपुंज्या नुकसानीची नोंद झाली असेल, तर भरपाई कशी मिळणार, हा प्रश्न आहे. हे लक्षात घेऊनच भाजपचा पाचवा आभासी स्तंभ काम करणार आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा स्तंभ आपल्या परीने काम करत आहे. पण अगदी छोट्या छोट्या आपद्ग्रस्तांपर्यंत पोहोचायला या माध्यमाला मर्यादा आहेत. शिवाय या माध्यमांच्या छोट्या-छोट्या प्रतिनिधींनी पाठविलेला अहवाल प्रसिद्ध करायलाही मर्यादा आहेत. हे लक्षात घेऊनच या चौथ्या स्तंभाला पूरक असा पाचवा स्तंभ सोशल मीडियाच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

‘द फिफ्थ पिलर’ या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमात आपद्ग्रस्तांसाठी ७३०४५०६९९९ हा व्हॉट्स अॅपचा क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर नुकसान झालेली कोणीही व्यक्ती आपल्या नुकसानीची छायाचित्रे, व्हिडीओ तसेच निवेदने पाठवू शकेल. त्यावर आलेली माहिती भाजप फेसबुक आणि यूट्यूबवर दिवसभरात चार वेळा प्रसिद्ध करणार आहे. नुकसान झालेली व्यक्ती कोणत्या वाडीतील, कोणत्या गावातील, कोणत्या तालुक्यातील आहे, हेसुद्धा त्याद्वारे समजणार असल्यामुळे नुकसानीचे नेमके चित्र डोळ्यांसमोर येऊ शकेल. गेल्यावर्षी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची छायाचित्रे आणि व्हिडीओ पाठविण्याचे आवाहन रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेव्हा केले होते. तसाच हा उपक्रम आहे. शासनाला आणि प्रशासनाला आपद्ग्रस्तांसाठी खरोखरीच मदत करायची असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचायचे असेल तर भाजपचा पाचव्या स्तंभाचा उपक्रम खूपच उपयुक्त ठरणार आहे. पण तशी मानसिकता असेल आणि त्या दृष्टीने त्याकडे पाहिले गेले, तरच त्याचे महत्त्व पटेल. अन्यथा विरोधकांचा सरकारला घेरण्याचा आणखी एक प्रयत्न, अशीच त्याची शासनाकडून संभावना होऊ शकेल. सकारात्मकतेने पाहिले तर आपद्ग्रस्तांना नक्कीच न्याय मिळू शकेल.

हा न्याय मिळेल की नाही हे सांगता येत नाही. मात्र सर्वसामान्य आपद्ग्रस्तांनी या माध्यमाचा जरूर उपयोग करून घ्यायला हवा. शासनाकडून त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला गेला, तर ज्या दूरच्या वाड्या-वस्त्यांपर्यंत प्रशासन पंचनाम्याच्या माध्यमातून पोहोचले नसेल, त्या सर्वांना नक्कीच दिलासा मिळेल. प्रत्येक आपद्ग्रस्ताने या माध्यमाचा उपयोग केला, तर कोकणातील नुकसानीचे सारे चित्रच सुस्पष्टपणे तयार होईल. एक प्रकारे ते तौते चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचे दस्तावेजीकरण ठरेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २८ मे २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २८ मेचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply