आरटी-पीसीआर चाचणीसाठी आता तोंड उघडायचे ते गुळण्यांसाठी!

घशातून नमुने घेण्याची गरज नाही

नागपूर : मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांपासून करोना चाचणी करणारी आरटी–पीसीआर पद्धती विकसित झाली आहे. नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) मार्गदर्शनाखाली ही अभिनव पद्धती विकसित केली आहे. सध्याच्या किचकट पद्धतीच्या चाचणीला हा उत्तम पर्याय निर्माण झाला आहे.

नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार यांनी या पद्धतीची माहिती दिली. ते म्हणाले, स्वॅब गोळा करण्याच्या पद्धतीला वेळ लागतो. त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे घशात काचेची नलिका घालून स्वॅब काढण्याचे तंत्रज्ञान असल्याने रुग्णांसाठी ते त्रासदायक असते. नमुने देण्याकरिता रांगा लागतात. अहवाल येण्यासाठी काही तास लागतात. गर्दी असेल, दोन दिवसांपासून अधिक वेळ लागू शकतो. त्याचाही रुग्णांना त्रास होतो. त्याला पर्याय म्हणून मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत विकसित करण्यात आली आहे. ती जलद आणि आरामदायक तर आहेच, पण या चाचणीचे निष्कर्ष तीन तासांत मिळू शकतात.

कसे संकलित करायचे नमुने?

व्यक्तीने मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यावर ते पाणी विशिष्ट नलिकेत जमा करायचे आहे. हा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. तेथे सामान्य तापमानात, नीरीने तयार केलेल्या एका विशिष्ट द्रावणात ते मिसळून ठेवले जाते. त्यानंतर द्रावण गरम केले जाते. त्यावेळी आरएनए टेम्प्लेट तयार होते. या आरएनएमधून पुढे आरटी-पीसीआर म्हणजेच रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेस चेन रिएक्शन (RT-PCR) प्रक्रिया केली जाते. नमुना संकलनाच्या आणि प्रक्रियेच्या या विशिष्ट पद्धतीमुळे आरएनए वेगळे काढण्याच्या महागड्या प्रक्रियासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत होते.

ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये, जेथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, तेथे चाचण्यांसाठी ही अभिनव चाचणी प्रक्रिया विशेष उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञान-विरहित चाचणी पद्धतीला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. हे तंत्रज्ञान देशभरात सगळीकडे वापरता यावे, यासाठी नीरीने या चाचण्यांचे प्रशिक्षण इतर प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञांना द्यावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

नागपूर महापालिकेने या पद्धतीनुसार चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे, त्यानुसार, मान्यताप्राप्त प्रोटोकॉलनुसार, नीरीने चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे.

नीरीच्या पर्यावरणीय विषाणू विभागातील सर्व शास्त्रज्ञ, संशोधक आणि तंत्रज्ञांसह इतर सर्व कर्मचारी आणि प्रयोगशाळा सहाय्यकांनी ही पद्धत विकसित करण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत. विदर्भात रुग्णसंख्या वाढली असताना त्यांच्या अथक प्रयत्नांतूनच हे पर्यावरणपूरक, रुग्णस्नेही तंत्रज्ञान विकसित होऊ शकले. या पद्धतींचा वापर देश पातळीवर करण्यात आला, तर लोकांना जलद, रुग्णस्नेही आणि लवकरात लवकर निष्कर्ष शोधून देणारी पद्धत मिळू शकेल. यातून करोनाविरुद्धची लढाई आणखी बळकट व्हायला मदत होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply