संगमेश्वरमधील स्वच्छतादूत मनोरुग्णांना राजरत्नने दिला मायेचा हात

एक महिला, एका वयोवृद्ध मनोरुग्ण घेतले ताब्यात

संगमेश्वर : ऊन, वारा, पाऊस आणि थंडी या कशाचीही तमा न बाळगता गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूला असणारा कचरा एकत्र करून परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृद्ध मनोरुग्णाला आणि महामार्गावर टाकल्या जाणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून जणू ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणाऱ्या मनोरुग्ण महिलेला रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने ताब्यात घेतले आणि त्यांना मायेचा हात देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मनोरुग्णालयात भरती केले.

संगमेश्वरजवळच्या माभळे येथे एक महिला महामार्गालगत स्वतःचे जेवण करून जेवते. या मनोरुग्ण महिलेला पुढील दोन दिवसांत होणाऱ्या अतिवृष्टीत धोका निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची एक पोस्ट छायाचित्रासह रामपेठ-संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली होती. ती माभळे पुनर्वसन येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत यांनी पाहिली आणि त्यांनी लगेचच मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठान या संस्थेचे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला. शिंदे यांनी आपल्या पथकासह संगमेश्वर येथे येण्याचे मान्य केले.

साधारण ४० वर्षे वयाची एक महिला संगमेश्वरमध्ये चार महिन्यांपूर्वी दाखल झाली. आल्यापासून ती महामार्गाच्या दुतर्फा टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्याचे काम करत होती. यासाठी ती माभळे येथून रत्नागिरीच्या दिशेने बावनदीपर्यंत तर चिपळूणच्या दिशेने सावर्ड्यापर्यंत जाऊन प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोणपाटात भरून आणायची. मनोरुग्ण असूनही ती पर्यावरण वाचवण्याचा संदेश आपल्या कामातून देत होती. एकत्र केलेल्या सर्व बाटल्या ती भंगारात विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. असे असले तरी तिच्या मनावर मोठा आघात झालेला असल्याने ती मध्येच ओरडायची आणि मुक्या प्राण्यांजवळ बोलत बसायची. माभळे येथील साधना बेंडके यांच्या हॉटेलमध्ये जाऊन रोज चहा, पाव आणि दूध अशा वस्तू ती पैसे देऊन घ्यायची. बेंडके यांच्या हॉटेलच्या बाजूलाच एका उघड्या शेडमध्ये ती रात्रीची निवाऱ्याला असायची.

सुमारे सहा वर्षांपूर्वी संगमेश्वरमध्ये ६० वर्षे वयाचा एक वृद्ध मनोरुग्ण आला. त्याचा कोणालाही त्रास नसल्याने तो माभळे आणि संगमेश्वर भागात फिरत असे. त्याला कोणी ना कोणी खायला-प्यायला देत असे. या वृद्ध मनोरुग्णाला महामार्गालगतचा परिसर स्वच्छ करणे ही एकच आवड. सकाळी ६ वाजल्यापासून महामार्गाजवळचा पालापाचोळा, अन्य कचरा एकत्र करून जाळून टाकायचा हे त्याचे एकच काम. माभळे संगमेश्वरवासीयांना या वृद्धाचा त्याच्या स्वच्छतेच्या कामासह स्वभावामुळे लळा लागला आणि त्याचे ‘राजाभाऊ’ असे नामकरणही झाले. उजव्या ढोपराची शस्त्रक्रिया झालेली असल्याने हा वृद्ध कमरेत वाकून चालायचा. माभळ्यात फिरत असताना साधना बेंडके आपल्या हॉटेलातून राजाभाऊना दररोज तीन वेळा चहा आणि दोन वेळा नाष्टा गेली सहा वर्षे न चुकता देत होत्या. यामुळे राजाभाऊंबद्दल त्यांना आत्मीयता वाटू लागली. अशातच बोलताबोलता राजाभाऊने बेंडके यांना आपण अमरावतीमधील चांदूररेल्वे भागात राहत होतो, अशीही माहिती सांगितली होती.

राजाभाऊ असोत अथवा ती महिला दोघेही माभळे-संगमेश्वरमधील “स्वच्छता दूत” होते. दोघांना जे काही खायला मिळेल त्यातील थोडा हिस्सा ते भटक्या कुत्र्यांना घालत. त्यामुळे या दोघांच्या आजूबाजूला सात-आठ कुत्री जणू त्यांच्या संरक्षणासाठीच कायम उभी असायची.

राजरत्नचे सचिन शिंदे आपले सहकारी सौरभ मुळ्ये, जया डावर यांच्यासह या दोघांना ताब्यात घेण्यासाठी माभळे संगमेश्वर येथे दाखल झाले. त्यावेळीदेखील शेवटच्या भेटीसाठी पाच-सहा कुत्री या दोन्ही मनोरुग्णांभोवती जमा झाली होती. सचिन शिंदे यांनी प्रथम दोघांचेही जटा झालेले केस कापले. नंतर सहकाऱ्यांनी त्यांना स्वच्छ आंघोळ घालून नवीन कपडे घालायला दिले. दोघांनी हे सर्व करून घ्यायला सुरुवातीला थोडा विरोध केला. मात्र राजरत्नला अशा कामांचा अनुभव असल्याने त्यांनी युक्तीने सारे निभावून नेले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत, अमोल शेट्ये, अविनाश सप्रे, पत्रकार दीपक भोसले, उद्योजक दीपक भिडे, साधना बेंडके, प्रशांत दळी, किशोर प्रसादे आदींनी मदत केली.

राजरत्न प्रतिष्ठानचे हे कार्य पाहून उद्योजक दीपक भिडे यांनी राजरत्नच्या सचिन शिंदे यांच्याकडे ५१२५ रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. दोन्ही मनोरुणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मनोरुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. राजरत्नने आजवर ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केलेल्या मनोरुग्णांची संख्या आता ९९ झाली आहे.

बेंडके यांना अश्रू अनावर

ज्यांचे राजाभाऊ असे नामकरण झाले होते, त्या वृद्ध मनोरुग्णाला घरच्या माणसाप्रमाणे माभळे येथील हॉटेल चालिका साधना बेंडके गेली सहा वर्षे दररोज न चुकता चहा-नाष्टा देत होत्या. त्यांच्याशी संवाद साधत होत्या. महिला मनोरुग्णदेखील बेंडके यांच्या हॉटेलसमोर असल्याने गेल्या चार महिन्यांत तीदेखील त्यांच्याशी एका अनामिक नात्याने जोडली गेली होती. राजरत्नने दोघांनाही मनोरुग्णालयात भरती करण्यासाठी गाडीत बसवल्यानंतर साधना बेंडके यांना अश्रू अनावर झाले. सचिन शिंदे यांनी बेंडके यांना धीर देऊन दोघांचीही काळजी करू नका, त्यांना त्यांचे नातलग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

  • जे. डी. पराडकर, संगमेश्वर
  • (9890086086)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply