रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५९० करोनाबाधित, आकडेवारीत तफावत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जून) करोनाचे नवे ५९० रुग्ण आढळले. आज ४२९ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. जिल्हा आणि कोविन पोर्टलवरील नोंदींमध्ये तफावत असल्याने सर्वच प्रकारच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ३१७, अँटिजेन चाचणी – १९९ (एकूण ५१६). आधी नोंद न झालेल्या ७४ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५९० आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ५८ हजार ५१६ झाली आहे.

आज पाच हजार ८६२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज सहा हजार ८२६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ३१ हजार ९०७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४२९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५० हजार ९८३ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.१२ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ६७१ झाली आहे. मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५४०, खेड १६५, गुहागर १३६, दापोली १४०, चिपळूण ३२६, संगमेश्वर १४५, लांजा ८७, राजापूर ९७, मंडणगड २२ (एकूण १६५८).

जिल्हा आणि कोविन पोर्टलवरील आकडेवारीत तफावत

जिल्ह्यातील करोनाविषयक आकडेवारीमध्ये काल, २२ जूनपासून बदल झाला आहे. एकूण बाधितांची संख्या, बरे झालेल्यांची संख्या, मृतांची संख्या ही सर्वच आकडेवारी बदललेली आहे. कालपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून येणारी आकडेवारी आणि राज्यस्तरीय आकडेवारी यात मोठी तफावत आहे. २१ जूनपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ७३१ होती. काल ती संख्या ५७ हजार ९२६ दाखविण्यात आली आहे. एका दिवसात नऊ हजार १९५ रुग्ण वाढले.

गेल्या २१ जूनपर्यंत २ लाख ५५ हजार २५० जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे चार्टमध्ये दिसते. कालच्या चार्टमध्ये मात्र ३ लाख २५ हजार ८१ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे नमूद केले आहे. एकाच दिवसात ६९ हजार ८३१ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

करोनामुक्तांची आकडेवारी देताना २१ जूनच्या चार्टमध्ये ४१ हजार ३१६ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे नमूद करण्यात आले होते. कालच्या चार्टमध्ये ५० हजार ५५४ रुग्ण मुक्त झाल्याचे म्हटले आहे. एका दिवसात ९ हजार २३८ जण करोनामुक्त झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. covid-19 पोर्टलच्या आधारे ही आकडेवारी देण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या राज्यभरातील इतर रुग्णांचादेखील अपडेशन करताना समावेश करण्यात आला आहे. यापुढील काळात रोज कोविड पोर्टल आधारित आकडेवारीचा चार्ट जारी करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply