राजापूर : येथील माय राजापूर संस्थेने करोनामुळे राजापूर तालुक्यातील पितृछत्र हरपलेल्या सोळा मुलांना मदतीचा हात दिला, तर धारतळे कोविड सेंटरलाही वस्तुरूपाने मदत केली. संस्थेच्या सदस्यांनी पदरमोडीतून संकलित केलेल्या ८७ हजार रुपयांच्या निधीमधून ही मदत देण्यात आली.
या सोळा मुलांपर्यंत महिनाभराचे अन्नधान्य, शालेय साहित्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. यासाठी मदत फेऱ्या काढण्यात आल्या. पहिल्या फेरीत उन्हाळे येथील सोडये कुटुंबीयांना आणि कोंड्ये येथील कांबळे कुटुंबीयांना मदत करण्यात आली. दुसऱ्या या फेरीत पेंडखले येथील निनावे, वडदहसोळ येथील पळसमकर, वडवली येथील पांचाळ कुटुंबीयांना मदत दिली गेली. शेवटच्या तिसऱ्या फेरीत भालावलीचे खानविलकर तर बेनगी-आडिवरे येथील वारिक कुटुंबीयाना माय राजापूर संस्थेने मदत केली.
माय राजापूरच्या सर्व सदस्यांनी स्वतःकडील रक्कम या कुटुंबीयांच्या मदत निधीत जमा केली. एकूण ८७ हजार रुपये या मदत कार्यासाठी खर्च करण्यात आले. यात धारतळे येथील कोविड सेंटरला दिलेल्या मदतीचादेखील समावेश आहे.
अकस्मात ओढवलेल्या करोनाच्या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज आहे. अनेक कुटुंबांची करोनाच्या आघाताने फरपट झाली आहे. घरातील एकमेव कमवती व्यक्तीचा अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून त्यांनी सावरावे आणि आपल्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणावा, यासाठी माय राजापूर संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन केले. पती आपल्याला सोडून गेला, पदरात तीन तीन मुली आहेत. आता आपले कसे होणार, म्हणून विवंचनेत असलेल्या मातांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माय राजापूरने मानसशास्त्राच्या प्राध्यापिका सौ. दीपा ढेकणे यांची मदत घेतली. यासाठी माय राजापूरच्या सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला आणि हताश झालेल्या मातांना धीर देण्यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क देखीलराखला.
अशा तऱ्हेने माय राजापूरने अजाण बालक मदत निधीच्या पहिल्या टप्प्याची सांगता केली. यापुढेही अशा अजाण बालकांना मदत करण्याचा मानस माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक प्रदीप कोळेकर आणि अध्यक्ष जगदीश पवार यांनी व्यक्त केला. मदतकार्यात माय राजापूरचे नरेश दसवंत, प्रकाश परवडी, भोसले मॅडम, पंडित मॅडम, ऋषीकेश कोळेकर, दत्तप्रसाद सिनकर या सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
(संपर्कासाठी – अध्यक्ष, जगदीश पवार – 91685 43460, प्रवर्तक, प्रदीप कोळेकर – 82751 34404)

