रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सुरू होताच ३०० पुस्तकांची देवघेव

रत्नागिरी : करोना लॉकडाउननंतर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आज सुरू होताच १५० वाचकांनी ३०० पुस्तके बदलून घेतली. ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही संख्या आहे. सुमारे तीन महिने वाचनालय वाचकांसाठी बंद होते, मात्र वाचक ग्रंथ वाचण्यासाठी आसुसलेले होते. वाचनालय सुरू कधी होणार, याबाबतची विचारणा सतत होत होती. मात्र शासनाच्या निर्देशांचे पालन आवश्यक असल्यामुळे नाइलाजाने वाचनालय बंद ठेवावे लागले होते.

पुस्तक संपदेने परिपूर्ण वाचनालय दालने आणि या पुस्तकांचे वाचन करणारा दर्दी वाचक हे शहराचे वैभव मानले जाते. रत्नागिरी ही सुसंस्कृत नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या नगरीत उत्तम वाचनालय आणि उत्तम वाचक आहेत, ती नगरी सुसंस्कृत म्हटली जाते. रत्नागिरी शहरामध्ये वाचनालयांची संख्या आणि दर्दी वाचकांची संख्याही मोठी आहे. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात केवळ ७५ रुपये मासिक वर्गणीमध्ये वाचक दोन पुस्तके एका वेळी घेऊन जाऊ शकतो. २०० रुपये अनामत, १०० रुपये प्रवेश शुल्क, ओळखीच्या कागदपत्रांची झेरॉक्स आणि अर्जावर एका सभासद वाचकाची शिफारस घेऊन कोणीही रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे वर्गणीदार सभासद होऊ शकतात. सभासदत्वानंतर एक लाख ७ हजार पुस्तकांचे ग्रंथालय वाचकांसाठी उपलब्ध होते.

अनफर्गेटेबल जगजित सिंग, आय हॅव नेवर बिन अन हॅपीयर (शाहीन भट्ट), अंतराळातील नेत्रदीपक महिला, डार्क हॉर्स – एक अकथित कहाणी, दशोराज, इस्रो – मी अनुभवलेले एक अभूतपूर्व स्वप्न, वादग्रस्त पुस्तके आणि कलाकृती, निवडक अनिल अवचट, मेळघाट – शोध स्वराज्याचा, रावपर्व इत्यादी नवीन पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. सर्व वयोगटातील सर्व बौद्धिक स्तरातील वाचकांना भावतील असे पुस्तक प्रकार उपलब्ध असलेल्या १९४ वर्षांची परंपरा लाभलेल्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात वाचनप्रेमी सुसंस्कृत नागरिकांनी आवर्जून वर्गणीदार सभासद व्हावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

आर्थिक मदतीसाठी आवाहन

दरम्यान, आर्थिक मदतीसाठीही अॅड. पटवर्धन यांनी आवाहन केले आहे. वाचनालयांची आर्थिक स्थिती सद्यःस्थितीत खूप खालावलेली आहे. शासनाने अनुदानाबाबत सकारात्मकता ठेवलेली नाही. नवीन वर्षाचे आणि गेल्या वर्षाचे अनुदान अजून वाचनालयांना मिळालेले नाही. गेले पाच महिने आणि त्यापूर्वीचे सात महिने आर्थिक ओढाताणीचे गेले आहेत. मात्र नियमित होणारे खर्च, ग्रंथांची देखभाल, साफसफाई, पावसाळी बाष्पयुक्त हवेपासून पुस्तकांचे संरक्षण, वीज बिल, पाणी बिल, कर्मचाऱ्यांचा पगार, अनिवार्य दुरुस्त्या हे खर्च करत असताना उत्पन्न मात्र बंद होते. वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळाने योग्य पद्धतीने नियोजन करून खर्चाचा हा डोंगर आजपर्यंत पेलला आहे. मात्र वाचनालयाला आर्थिक मदतीची प्रचंड आवश्यकता आहे. वाचनालयाला मोठ्या प्रमाणावर देणगी देऊन वाचनप्रेमींनी सहकार्य करावे. राज्यातील पहिल्या आणि १९४ वर्षांच्या या संस्थेला समाजाच्या सर्व स्तरातून आर्थिक मदत मिळाली, तर वाचनालयाची आर्थिक चणचण सहजपणे दूर होईल. नवनवे उपक्रम घेऊन वाचनालय परत एकदा सुसंस्कृत रत्नागिरीचे वैभव म्हणून अग्रेसर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

द्विशताब्दी वर्षाकडे वाटचाल करताना नवीन उद्दिष्टे वाचनालयासमोर आहेत. अभ्यासिका सुरू करणे, तसेच स्वतंत्र संदर्भ ग्रंथ विभाग सुरू करणे, त्याच बरोबर छोटे सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम यासाठी कलाकारांना दालन उपलब्ध करून देणे आणि शासनाची मदत घेत जुन्या दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करणे, इमारतीचे नूतनीकरण करणे ही वाचनालयाची उद्दिष्टे आहेत. सर्वांचे सहकार्य वाचनालयाला अधिक ऊर्जितावस्थेत नेईल, असा विश्वासही श्री. पटवर्धन यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील सर्व शिक्षकवर्ग, अधिकारीवर्ग, वकील, डॉक्टर, पेन्शनर्स, साहित्यक्षेत्रातील धुरीण, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांनी आणि प्रामुख्याने युवा, विद्यार्थी यांनी वाचनालयाचे वर्गणीदार सभासद व्हावे आणि आवर्जून वाचनालयातील ग्रंथसंपदेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply