चिपळूण वाचनालयाच्या सभागृहाला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या नव्याने अद्ययावत होणाऱ्या सभागृहाला ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे.

चिपळूणला नुकत्याच आलेल्या महापुरात वाचनालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आणि मुंबई-गोवा महामार्गावरील अश्मयुगकालीन वस्तूंचा संग्रह असलेले वस्तुसंग्रहालय उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर आता संग्रहालय वाचनालयाच्या नव्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर उभारले जाणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी लागणाऱ्या जागेची आवश्यकता लक्षात घेऊन सध्याचे संग्रहालय असलेल्या तळ मजल्यावरील जागी नव्याने ‘बाळशास्त्री जांभेकर सभागृह’ साकारले जाणार आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि कार्यवाह धनंजय यांनी दिली.

बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार, आद्य प्राध्यापक आणि आद्य समाजसुधारक होते. आचार्य अत्रे यांनी केलेल्या टिपणीनुसार, बाळशास्त्री जांभेकर हे कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययन न करता त्यांनी आपल्या दर्पण नियतकालिकामधून सामाजिक सुधारणेवर त्यांनी भर दिला होता. दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते. बाळशास्त्री जांभेकर यांचे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे, हे आजच्या माध्यम क्रांतीसंदर्भात अभ्यासले असता सहजतेने लक्षात येऊ शकते. वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्ये याबाबतचे शिक्षण दिले जाते. याच विचारधारेनुसार १९० वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. तो काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा होता. या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करू परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटल्याने त्यांनी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ पाक्षिकाची सुरपवात केली होती.

‘दर्पण’ मधील मजकुराचा दर्जा उच्च होता. त्याकाळी सुरब झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करून घेत समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली. केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून ‘दर्पण’ प्रकाशित केले. ‘दर्पण’ मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. तत्कालीन प्रमुख ८ भाषा आणि अनेक शास्त्रांत ते पारंगत होते. १८३४ साली भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला होता. १८४५ साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांवर ग्रंथ लिहिले. बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लीलया संचार करणारे पंडित होते. वडील पंडित गंगाधरशास्त्री आणि धार्मिक आणि धर्मपरायणवादी आई सगुणाबाई यांचा वारसा बाळशास्त्रींना मिळाला होता. कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे नाव वाचनालयाने सभागृहाला देणे भूषणावह आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply