टेंभ्ये शिक्षण संस्थेचे सचिव राजाभाऊ साळवी यांची १६ ऑक्टोबरला शोकसभा

रत्नागिरी : टेंभ्ये पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव टेंभ्ये ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या टेंभ्ये शाखेचे अध्यक्ष आणि क्षत्रिय मराठा मंडळाचे सरचिटणीस राजाभाऊ साळवी यांची शोकसभा येत्या १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

राजाभाऊ साळवी (वय ८०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (३ ऑक्टोबर) निधन झाले.

राजाभाऊ साळवी १९७९ मध्ये टेंभ्ये येथील कै. बा. रा. नागवेकर तथा हातिसकर मास्तर माध्यमिक विद्यालय आणि २००३ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये अग्रस्थानी होते. त्यामुळे टेंभ्ये-हातिस पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण सहजगत्या उपलब्ध झाले. टेंभ्ये ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या माध्यमातून रत्नागिरी शहराशी टेंभ्ये, टिके गावांचा संपर्क जोडला जावा, यासाठी टेंभ्ये पूल उभारण्यामध्ये त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. टेंभ्ये गावात तालुक्यातील पहिले समाज मंदिर उभारण्यामध्ये ते अग्रस्थानी होते. टेंभ्ये-हातिस व टेंभ्ये-चांदेराई रस्ता तयार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. टेंभ्ये गावात विकास सोसायटी, पोस्ट ऑफिससारखी लोकोपयोगी कार्यालये उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राजाभाऊ साळवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष उत्तम नागवेकर, कार्याध्यक्ष अनंतराव साळवी, खजिनदार रामचंद्र शिंदे , संस्था सदस्य आणि अध्यापक योगेश साळवी, ज्येष्ठ अध्यापक मंगेश जाधव, सर्व अध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. टेंभ्ये पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडाळाच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या १६ ऑक्टोबर रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थाध्यक्ष उत्तम नागवेकर यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply