रत्नागिरी जिल्ह्यातील ‘गायमुखी’ला आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मानाचे पान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेल्या ‘गायमुखी’ला एका वनस्पतीने न्यूझीलंडमधल्या विज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये मानाचे पान मिळवले आहे.

नरवण (ता. गुहागर) परिसरात ‘गायमुखी’ किंवा ‘सुईची भाजी’ या स्थानिक नावानं एक वनस्पती ओळखली जाते. राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरुडे, परेश भालेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजमधील वनस्पतीशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी, त्यांचे संशोधक विद्यार्थी नीलेश माधव यांना ही फूलवनस्पती आढळली. त्यांनी त्याविषयी संशोधन केले. या नव्या प्रजातीच्या फूलवनस्पतीचा शोधनिबंध न्यूझीलंड येथील जगविख्यात जर्नल फायटोटॅक्सामध्ये (Phytotaxa) प्रसिद्ध झाला.

या फूलवनस्पतीचे ‘डिपकाडी जनाई-श्रीरंगी’ (Dipcadi janae-shrirangii) असे नामकरण करण्यात आले आहे. ही फूलवनस्पती प्रदेशानिष्ठ असून कोकणातील जांभ्या पठाराव्यतिरिक्त अन्य कोठेही आढळत नाही. नवसंशोधित ‘डिपकाडी जनाई श्रीरंगी’ वनस्पतीच्या जगात ४३ प्रजाती असून भारतामध्ये १२ प्रजातींची नोंद झाली आहे. ही शतावरी कुळातील (Asparagaceae) वनस्पती आहे. तिची फुले पांढर्‍या रंगाची असून बी आणि फळे लहान आहेत. जुलै ते ऑगस्ट हा या वनस्पतीला फुले आणि फळे येण्याचा कालावधी असतो.

गोवा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. एम. के. जनार्दन यांच्या नावावरून ‘जनाई’, तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावावरून ‘श्रीरंगी’ हे नाव या वनस्पतीला देण्यात आले आहे. या संशोधनाकरिता आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, डॉ. के. एन. गांधी, हार्वर्ड विद्यापीठ (हर्बेरियम, केंब्रिज) येथील सिनीयर नोमेनक्लेचर रजिस्ट्रार डॉ. शरद कांबळे, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नवी दिल्ली येथील भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळ यांनी मदत केली.

या वनस्पतीमुळे कोकणातील आणखी एका वनस्पतीला जागतिक स्तरावरच्या जर्नलमध्ये मानाच पान मिळाले आहे.

डॉ. एम. के. जनार्दन आणि डॉ. श्रीरंग यादव
प्रा. अरुण चांदोरे आणि डॉ. कुमार विनोद गोसावी
संशोधक विद्यार्थी देवीदास बोरुडे, परेश भालेकर, ननीलेश माधव.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply