भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात
कार्यक्रमात २६ डिसेंबर २०२१ रोजी ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित केले आणि वाचनाची आवड वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांची ही मन की बात द्विशतकाकडे वाटचाल करणारे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय साकारत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली सात वर्षे दर रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून देशवासीयांशी संवाद साधत आहेत. गेल्या २६ डिसेंबरच्या कार्यक्रमात त्यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, पुस्तके फक्त ज्ञान देतात असे नाही, तर व्यक्तिमत्व घडवण्याचे, आयुष्य घडवण्याचेही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळे एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. आजकाल अनेक लोक आपण यावर्षी किती पुस्तके वाचली, हे अतिशय अभिमानाने सांगत असतात. आता यापुढे मला अमूक पुस्तके वाचायची आहेत, असेही सांगतात. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मन की बात’च्या श्रोत्यांनी या वर्षात वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पाच पुस्तकांविषयी सांगावे. यामुळे नव्या वर्षात इतर वाचकांना चांगली पुस्तके निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रीन टाइम’ थोडा जास्तच वाढत आहे. त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनले पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.
वाचनसंस्कृतीविषयी सांगताना त्यांनी तेलंगण राज्यातील ८४ वर्षीय डॉक्टर कुरेला विठ्ठलाचार्य यांचे उदाहरण दिले. पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची जिद्द असते, तेव्हा वय आडवे येत नाही, याचे विठ्ठलाचार्य हे उदाहरण आहेत. विठ्ठलाचार्यजींची लहानपणापासून एक इच्छा होती की एक मोठे वाचनालय सुरू करावे. देश तेव्हा गुलामीत होता, काही परिस्थितीमुळे त्यांचे ते स्वप्न तेव्हा स्वप्नच राहिले. आता ६-७ वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा आपले स्वप्न साकार करण्याच्या कामाला लागले. विठ्ठलाचार्य यांनी स्वतःची पुस्तके वापरून वाचनालय सुरू केले. आपली आयुष्याची सगळी कमाई त्यांनी या कामात लावली. हळूहळू लोक सोबत येत गेले आणि योगदान करू लागले. यदाद्रि-भुवनागिरी जिल्ह्याच्या रमन्नापेट भागातल्या या वाचनालयात आज जवळजवळ २ लाख पुस्तके आहेत. विठ्ठलाचार्य यांना बघून आज खूप आनंद होतो की मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन इतर गावांतील लोकदेखील वाचनालय उभारण्याच्या कामी लागले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या या संवादाचा धागा पकडून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पंतप्रधानांच्या वाचनाच्या हाकेला ओ देण्यासाठी वाचनालय किती सज्ज आहे, हे स्पष्ट केले. त्यांनी केलेले निवेदन आणि वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी केलेले आवाहन त्यांच्याच शब्दांत.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची प्राचीन ग्रंथसंपदा जतन करण्याच एक आव्हान निर्माण झाले आहे. दुर्मिळ अशी ही ग्रंथसंपदा जतन करण्याचे यज्ञकर्म सर्वांच्या सहयोगातून सिद्ध होऊ शकेल, त्यासाठी ही आर्जवी साद आपणाला घालत आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय आता १ लाख ८ हजार ग्रंथसंपदा असलेले समृद्ध वाचनालय आहे. १९४ वर्षांपासून रत्नागिरीच्या सुसंस्कृत उन्नत वारशाचा हा जागता साक्षीदार. महाराष्ट्रातील हे सर्वांत जुने वाचनालय १८ व्या शतकातील ग्रंथांच्या आवृत्ती आजही वाचकांना उपलब्ध करून देणारे हे वाचन मंदिर. स्वा.सावरकर यांनी रत्नागिरीच्या वास्तव्यात तेव्हाच्या नेटिव्ह लायब्ररीचे नगर वाचनालय असे नामकरण केले. स्वामी स्वरूपानंद स्वतः या वाचनालयात येऊन वाचन करीत, असे तत्कालीन लोक सांगतात. अशा अनेक आठवणींचा जागता साक्षीदार असलेले हे वाचनालय आहे.
गेली २० वर्षे या वाचन मंदिराची धुरा सांभाळत असताना वाचनालयाला उत्तम आर्थिक पायावर उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मी ज्या स्वरूपानंद पतसंस्था आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यरत आहे, त्यांचा सहयोग घेत अनेक नव्या गोष्टी, उपक्रम वाचनालयात झाले. मध्यवर्ती बँकेला जागा भाड्याने देऊन दरमहा २ लाखपेक्षा जास्त भाड्यापोटी उत्पन्न प्राप्त केले. मात्र वाचनालयाची मोठी ठेव PMC बँकेत अडकून पडली. तसेच करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे गेली दोन आर्थिक वर्षे खूप कठीण गेली. त्यात शासनाचे अनुदान वेळेत मिळाले नाही. उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद होते. दुसऱ्या बाजूला नियमित खर्च अनिवार्यपणे करावे लागत होते. प्रामुख्याने दर वर्षाला सुमारे साडेसात लाखाचा असा वेतन खर्च गेली दोन वर्षे वाचनलयाने नियमित केला . कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात वेतन दिले. लॉकडाउनमध्ये वाचनालय बंद असूनही वेतन अदा करून आपले कर्तव्य चोख बजावले.
याचबरोबर पुस्तक देखभाल तसेच वीज, पाणी, बिल तसेच संगणक देखभाल, वाचनालयाची साफसफाई या सर्वांवर होणारा खर्च उत्पन्नाची सर्व साधने बंद असताना संचित पुंजीतून केला. हे कमी होते, म्हणून यंदाच्या प्रचंड पावसाने वाचनालयाच्या भिंतींमधून खूप पाणी झिरपून आत आले. त्या बंदोबस्तासाठी खूप अतिरिक्त खर्च करावा लागला. पण वाचनालय सुरक्षित ठेवण्यासाठी हा खर्च अनिवार्य होता.
हे सर्व पूर्ण होते तोवर वाचनालयाचे फर्निचर, शोकेस इतकेच नव्हे तर हॉलमधील स्टेजला, काउंटरला वाळवी लागली. हे पाहिल्यावर मन हादरले. उद्विग्न झाले. अस्वस्थता आली. मौल्यवान ग्रंथांपर्यंत पोहोचण्यापूर्वी वाळवीचे उच्चाटन आवश्यक होते. युद्धपातळीवर निर्णय करत, जलद कार्यवाही करत वाळवी प्रतिबंधात्मक गोष्टी केल्या. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पेस्ट कंट्रोल ट्रीटमेंट केली. सर्व पुस्तके, कपाटे यावरही आवश्यक ट्रीटमेंट केली.
एवढे करून विषय थांबत नव्हता. संपूर्ण फर्निचर, शोकेस केबिन, काउंटर, खिडक्यांच्या फ्रेम या सर्व ठिकाणी वाळवी होती. ते सर्व लाकूड आणि प्लायवूड सामान तात्काळ काढून टाकले आणि नवीन सेटअप उभारला आहे.
वाळवीचा हा अनुभव खूप हादरवून गेला. १ लाख ८ हजार पुस्तकांची देखभाल हे खूप कठीण काम आहे. ही पुस्तके म्हणजे मोठा ठेवा आहे. तो जतन झालाच पाहिजे. ही ग्रंथसंपदा मौल्यवान आहे. पैसे खर्चूनही ती नव्याने उपलब्ध होणार नाही. त्याचे जतन करावे लागेल त्यासाठी डिजिटायझेशन हा एकमेव पर्याय आहे. मात्र तो खूप खर्चिक आहे. वाचनालयाची उपलब्ध साधने, उत्पन्नाचे मर्यादित स्रोत यावर विसंबून हे काम होणार नाही. त्यात वाचनालयाच्या इमारतीचे काम करावे लागणार आहे. इमारत ५० वर्षांची होत आहे.
वाचनालयाचे हिशेबीय कामकाज नेटके आहे. सर्व रेकॉर्ड संगणकीकृत आहे. नियमित ऑडिट केले जाते. 80 G चे सर्टीफिकेट उपलब्ध आहे. वाचनालयाची मासिक वर्गणी १०० रुपयेही नाही. तरीही अद्ययावत बहुविध पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेकविध उत्तम सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम वाचनालय गेली २० वर्षे सातत्याने करत आले आहे.
या जुन्या महत्त्वपूर्ण संस्थेला आर्थिक योगदानाची आवश्यकता आहे. द्विशतकाकडे वाटचाल करणारे हे वाचनालय विपुल ग्रंथसंपदा, अनेक जुने संदर्भ यांनी समृद्ध आहे. साहित्य संमेलन, स्वा. सावरकर साहित्य संमेलन यांचे यशस्वी आयोजक असलेली ही संस्था. सर्वांत जुने पण सर्वांत अद्ययावत असलेले हे वाचनालय. रत्नागिरीचा सांस्कृतिक मानबिंदू असलेले हे वाचनमंदिर. आपला ग्रंथठेवा सुरक्षित ठेवावा, म्हणून आपल्याला साद घालत आहे. ग्रंथप्रेमींनी शक्य असेल ती आर्थिक मदत वाचनालयाला करावी. वाचनालयाचा वाढलेला व्याप, विविध उपक्रम पाहता शासनाचे बेभरवशी अनुदान अत्यल्प ठरते. त्यामुळे त्यावर विसंबून न राहता विविध मार्गांनी निधी उभारणी करत आलो. त्याचाच एक भाग म्हणून जनयोगदानातून या वाचनालयाचा अमूल्य ग्रंथठेवा जतन होण्यासाठी तसेच अन्य सुविधा निर्माण करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उभारणे आवश्यक आहे.
या ग्रंथालयाचे महत्त्व लक्षात घेऊन तसेच पंतप्रधानांनी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी केलेले आवाहन लक्षात घेऊन या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पासाठी स्वेच्छेने आर्थिक योगदान करावे, अशी विनंती आहे. लोकसहभागातून ग्रंथ जतन करणारे रत्नागिरी शहर अशी ओळख ग्रंथप्रेमी देणगीगारांच्या मदतीने निर्माण करू या. त्यासाठी आपले योगदान अनमोल ठरणार आहे.
- अॅड. दीपक पटवर्धन,
- अध्यक्ष, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी
देणगीदारांना 80 G सर्टिफिकेटही उपलब्ध आहे. देणगीदारांना रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नावे चेकद्वारे देणगी जमा करता येईल. याशिवाय रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या बँक खात्यातही देणगी थेट जमा करता येईल. त्यासाठी खाते क्रमांकाचा तपशील असा –
Ratnagiri District Central co-op. Bank Ltd. Ratnagiri
Branch :- H O Ratnagiri
A/c no. 1611006022828
IFS Code :- IBKL0574RDC