रत्नागिरी : मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरीतर्फे बायथले (धावणे – पोहणे- धावणे) पद्धतीची मॉडर्न पेंटॅथलॉन राज्यस्तरीय स्पर्धा १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आली आहे, अशा राज्यस्तरीय स्पर्धेचे रत्नागिरीत प्रथमच आयोजन होत आहे, अशी माहिती मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पाटणकर आणि उपाध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय स्तरावरचे यश रत्नागिरीच्या प्रसिद्ध जलतरणपटू डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी कझागिस्थान येथे जून २०१९ मध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेत ५० वर्षांवरील गटामध्ये सुवर्णपदक पटकावून प्राप्त केले आहे. त्यानंतरच त्यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांना क्रीडाप्रकारातील नवे क्षेत्र खुले व्हावे यासाठी रत्नागिरीत या असोसिएशनची सुरुवात झाली. मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरीची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली. त्यावेळी सावर्डे येथे शालेय मुलांसाठी विभागीय स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यातून तनया मिलके आणि मधुर शेलार या रत्नागिरीच्या दोघी राज्यस्तरीय स्पर्धेत निवडल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र करोनाकाळात स्पर्धा बंद होत्या. येत्या फेब्रुवारीत पुन्हा स्पर्धा सुरू होत आहेत.
धावणे – पोहणे- धावणे अशा पद्धतीची बायथले राज्यस्तरीय स्पर्धा रत्नागिरीत प्रथमच होत असून ती रत्नागिरी शहरातील जलतरण तलाव येथे होणार आहे. यामध्ये ८ वर्षांखालील ते ६० वर्षापर्यंतच्या खेळाडूंचे तसेच दिव्यांग खेळाडूंचे वयोमानानुसार गट आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर राष्ट्रीय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय बायथले स्पर्धा होणार आहेत.
पुणे आणि मुंबई येथे अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने होत असतात. मात्र रत्नागिरीत अशा प्रकारच्या स्पर्धा होत नाहीत. मात्र रत्नागिरीतील मुलांना संधी मिळावी, यासाठी असोसिएशनतर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ८ वर्षांखालील गटात २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे आणि २०० मीटर धावणे ते १६०० मीटर धावणे, २०० मीटर पोहणे आणि १६०० मीटर धावणे असे त्या त्या गटामध्ये त्या त्या अंतराच्या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाला मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, प्रशिक्षक जितेंद्र खासनीस उपस्थित राहणार आहेत, असेही श्री .पाटणकर यांनी सांगितले.
स्पर्धा राज्यस्तरीय असली, तरी कोकणातील अधिकाधिक मुलांनी त्यात सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे. सर्व गटात रत्नागिरी जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
पत्रकार परिषदेला असोसिएशनच्या सचिव डॉ . निशिगंधा पोंक्षे, डॉ. तोरल शिंदे, कोषाध्यक्ष श्वेता जोगळेकर, अविनाश काळे, प्रवीण डोंगरे, दीपक देवल, किरण जोशी, विनोद मयेकर, हेरंब जोगळेकर, प्रशिक्षक महेश मिलके उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड