चिपळूण : रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘साप्ताहिक सत्यशोधक’ला येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे देण्यात येणारा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
रत्नागिरी येथे १८७१ साली कै. हरि नारायण लिमये यांनी ‘सत्यशोधक’ साप्ताहिकाचा पाया घातला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण, जातीयता व विकासाच्या प्रश्नांना चालना देणारे सर्वसामान्यांचे व्यासपीठ असावे, असा सुप्त हेतू मनात बाळगून त्यांनी आपल्या साप्ताहिकाला ‘सत्यशोधक’ असे नाव दिले होते. ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणे, सत्याचा वेध घेत परिस्थितीनुरूप वृत्त प्रकाशित करणे, राष्ट्रीय विचाराला प्राधान्य देणे अशा प्रमुख भूमिकेतून या साप्ताहिकाने त्या काळात तळकोकणात जनजागृती करण्याचे व्रत स्वीकारले होते. १८७१ चा हा काळ पारतंत्र्याचा होता. तेव्हा हे धाडस करणे म्हणजे तळहातावर निखारा घेऊन चालण्यासारखे होते. हात भाजू द्यायचा नव्हता की निखारा विझू द्यायचा नव्हता. १८७१ ते १९३७ पर्यंत ‘सत्यशोधक’चे वेदवाक्य, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ असे होते. १९३५ ते १९६० पर्यंत फारशी वृत्तपत्रे, साप्ताहिके नसल्याने ‘सत्यशोधक’ साप्ताहिक आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांना साप्ताहिक सत्यशोधकचे सहकार्य लाभलेले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. त्यावेळी ‘सत्यशोधक’ने प्रकाशित केलेला २४ पानी अंक बहारदार ठरला होता. कोयना भूकंप काळात सलग दोन आठवडे वीजप्रवाह खंडित झाला होता. त्यावेळी छोट्या मशीनवर एकचतुर्थांश आकारात ‘सत्यशोधक’ साप्ताहिकाचे दोन अंक प्रकाशित केले गेले होते. पायाने ट्रेडल मशीन चालवून साप्ताहिक प्रकाशित करून ‘सत्यशोधक’ने भूकंपाच्या हाहाकाराची माहिती कोकणातील कानाकोपऱ्यातील वाचकांपर्यंत पोचविली होती. सत्यशोधकमध्ये सुरुवातीपासून ऑक्टोबर १९९७ पर्यंत लेटरप्रेस मुद्रण व्यवस्था होती. विद्यमान संपादक नितीन लिमये यांनी पुणे विद्यार्थी गृह येथून ‘डिप्लोमा प्रिंटिंग’चे शिक्षण घेतल्यावर ऑफसेट मुद्रण पद्धतीने साप्ताहिकाची छपाई सुरू झाली.
अशा या ‘साप्ताहिक सत्यशोधक’ला बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्काराचे वितरण मराठी पत्रकार दिनी, ६ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता होईल. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.
यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या नव्याने अद्ययावत होत असलेल्या ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, चिपळूणचे आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे, कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड