कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवा साहित्य संमेलन लांबणीवर

ठाणे : नव्या वर्षातील पहिलेच व्यापक संमेलन ठरले असते असे कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन करोनाबाधितांची वाढती संख्या आणि नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय कोमसापने घेतला आहे.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ११ आणि १२ जानेवारीला हे संमेलन होणार होते. आता या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची नवी तारीख आणि अन्य तपशील जानेवारीच्या अखेरीस कोमसाप जाहीर करेल, असे कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.

विविध साहित्यिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद, मैफिली अशी भरगच्च कार्यक्रमपत्रिका असलेल्या या दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाची तयारी ऐन भरात असताना कोमसापने सध्याच्या वाढत्या करोनाप्रसाराच्या वातावरणात दक्षता म्हणून संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झालेले प्रणव सखदेव यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर स्वागताध्यक्षपद ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के भूषविणार आहेत. राज्याच्या विविध भागांतील युवा साहित्यिकांची या संमेलनातील विविध सत्रांमध्ये साहित्याविष्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या सुमारे महिनाभरापासून या संमेलनाची तयारी कोमसापकडून सुरू होती. मात्र संमेलनाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असतानाच करोना संक्रमणाचा वेग संपूर्ण देशभरच वाढू लागला आणि सरकारी यंत्रणांकडून करोनाविषयक नवे सार्वजनिक निर्बंधही लागू करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आनंद विश्व गुरुकुल येथील संमेलन केंद्रात साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत कोमसापची बैठक घेण्यात आली. करोनाप्रसाराचा वेग पाहता, दक्षता म्हणून संमेलन तूर्त स्थगित करून ते करोनाचे वातावरण निवळल्यानंतर घेण्याचे कोमसापने या बैठकीत ठरवले असल्याचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी स्पष्ट केले. तसेच या दोन दिवसीय संमेलनाच्या नव्या तारखा, वेळापत्रक आणि अन्य तपशील जानेवारीच्या अखेरीस कोमसापकडून जाहीर केल्या जातील, असेही डॉ. ढवळ यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात झालेल्या कोमसापच्या बैठकीस कोमसापच्या युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर, कोमसापचे प्रसिद्धी प्रमुख जयू भाटकर, कोमसापच्या सल्लागार समितीचे सदस्य कमलेश प्रधान, संमेलन समन्वयक प्रा. हर्षला लिखिते, कोमसाप ठाणे शाखेच्या संगीता कुलकर्णी यांच्यासह कोमसापचे अन्य पदाधिकारी आणि संमेलन कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते. संमेलन पुढे ढकलण्यात आले असले, तरी संमेलनाची तयारी करण्यास आणखी वेळ मिळाला असल्याची भावना यावेळी कोमसापच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आणि संमेलनाच्या नव्या तारखांनिशी उत्तम नियोजन करण्याचा निर्धार स्पष्ट केला.

दरम्यान, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले, आरोग्य यंत्रणा आणि महापालिका प्रशासन साथनियंत्रणासाठी उत्तम काम करते आहे. परंतु नव्याने लागू झालेले निर्बंध आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, संमेलन घेणे अयोग्य ठरले असते. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तूर्त संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय कोमसापने घेतला आहे, याची सर्व साहित्यप्रेमींनी नोंद घ्यावी. संमेलनाच्या नव्या तारखा आणि अन्य तपशील जानेवारीच्या अखेरीस कोमसाप जाहीर करेल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply