गोवा शिपयार्डचे काही उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्याचा प्रयत्न – अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : गोवा शिपयार्डच्या विस्तारात काही उपक्रम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. तसेच या प्रोजेक्टच्या विविध कामांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना काम देता आले, तर नियुक्तीचा खरा आनंद मिळेल, असे गोवा शिपयार्डमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त झालेले दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या गोवा शिपयार्ड कंपनीचे संचालक म्हणून श्री. पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर श्री. पटवर्धन यांनी गोवा शिपयार्ड कंपनीच्या गोव्यातील मुख्य कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले, केंद्र शासनाने माझी नियुक्ती केली. त्यानुसार कंपनीच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन कामकाजामध्ये भाग घेतला. संपूर्ण प्रोजेक्टची पाहणी केली. गोवा शिपयार्डच्या माध्यमातून मरीनसंदर्भात तसेच फिटिंग, वेल्डिंग संदर्भात काही ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीत उघडता येतील का, तसेच पर्यटनाला पूरक अशा यांत्रिक बोटी रत्नागिरीच्या खाड्यांमध्ये आणता येतील का, यासंदर्भात प्राथमिक चर्चा पहिल्या बैठकीत झाली. खूप मोठी जबाबदारी आणि वेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मला भाजपा संघटनेने दिली आहे. त्याचा प्रभावी उपयोग करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

ते म्हणाले, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक बी. बी. नागपाल यांची भेट घेतली. त्यांच्यासह अन्य तीन संचालकांबरोबर प्रेझेंटेशन पाहिले. गोवा शिपयार्डच्या प्रगतीने चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. गोवा शिपयार्डमध्ये लहान-मोठी जहाजे बनवणे आणि दुरुस्तीचे काम चालते. या शिपयार्डचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले असून १३०० कोटी रुपये खर्चाचा नवा अत्याधुनिक अद्ययावत प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स, फास्ट पेट्रोल व्हेसल्स, मिसाइल क्राफ्ट, सेल ट्रेनिंगशिप, टग्स, फिशिंग व्हेसल्स, पॅसेंजर व्हेसल्स तसेच नव्याने ग्लास इन्फोर्स प्लास्टिक बोट्स, इंटरसेप्टर बोट्स, डॅमेज कंट्रोल स्टिम्युलेटर, न्युक्लिअर, बायॉलॉजिकल अँड केमिकल ट्रेनिंग फॅसिलिटी, सर्व्हव्हायवल अँड सी ट्रेनिंग अशा अनेक उपक्रमांमध्ये शिपयार्ड अग्रेसर आहे. इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड, पोलीस डिपार्टमेंट तसेच काही मित्र राष्ट्र हे शिपयार्डचे ग्राहक आहेत.

आजपर्यंत या शिपयार्डने २१९ जहाजे बांधून मागणीनुसार पुरवठा केला आहे. या शिपयार्डचे अध्यक्ष श्री. नागपाल यांनी आवर्जून आकडेवारीसह सांगितले की, हे शिपयार्ड सातत्याने मोठ्या नफ्यात असून घेतलेले सर्व प्रोजेक्ट विहित मुदतीत पूर्ण करण्याचा कटाक्ष कायम राखला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या यार्डकडे त्यांचे विशेष लक्ष असून केंद्र शासनाचे नियंत्रण आणि सहाय्य या दोहोंचा लाभ येथील कार्यपद्धतीला झाला आहे.

श्री. नागपाल निवृत्त नेव्ही अधिकारी असून उच्चशिक्षित अभियंता आहेत. यापूर्वी परराष्ट्रात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले असून या क्षेत्रातला दांडगा अनुभव आणि ज्ञान त्यांना आहे. अत्यंत स्वच्छ कार्यपद्धती, कमालीची शिस्त, नीटनेटकेपणा त्याचबरोबर आवश्यक असणारी प्रोफेशनल, कॉर्पोरेट कार्यपद्धती यामुळे गोवा शिपयार्ड प्रचंड वेगाने नवनवीन उपक्रम यशस्वी करत आहे. अशा आस्थापनेवर भाजपा नेतृत्वाने विश्वास ठेवून काम करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल कमालीची कृतज्ञता वाटते, असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

संचालक म्हणून ५ समित्यांवर सदस्य म्हणून त्यातल्या २ समित्यांवर चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली. कंपनी कायद्यानुसार या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संचालक म्हणून पदभार घेतानाचा दोन महत्त्वपूर्ण समित्यांवर चेअरमन म्हणून काम करता येण्याचे भाग्य लाभले, हे खूप अभिमानास्पद आहे, असेही श्री. पटवर्धन यांनी नमूद केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply