रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पंचेचाळिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या #AIRnext वक्तृत्व स्पर्धेत संजना सूर्यकांत कानगल आणि हर्षाली अभिजित केळकर या दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली.
आज येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन #AIRnext स्पर्धेत एकूण १५ तरुण स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी आत्मनिर्भर भारत – माझी संकल्पना, स्त्री – आजची उद्याची, माझं रोल मॉडेल या विषयांवर युवक स्पर्धकांनी वक्तृत्व सादर केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अनिल दांडेकर आणि सौ. ज्योती मुळ्ये यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्व आकाशवाणी केंद्रांच्या माध्यमातून युवकांची मते जाणून घेणारी ही स्पर्धा आहे. येत्या १३ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून ही मते प्रसारित होतील. या स्पर्धेतील या निवडक दोन स्पर्धकांचा या कार्यक्रमात सहभाग असेल. उर्वरित सर्व स्पर्धकांनाही वेळोवेळी आकाशवाणीच्या कार्यक्रमात संधी दिली जाणार आहे.
रत्नागिरीतील स्पर्धेच्या वेळी आकाशवाणी रत्नागिरीचे केंद्रप्रमुख श्रीनिवास जरंडीकर, अभियांत्रिकी विभाग प्रमुख चंद्रशेखर मडीवालर, कार्यक्रमाधिकारी समन्वयक नंदादीपक बट्टा उपस्थित होते. स्पर्धेसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी उपस्थित होते. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रा. जयंत अभ्यंकर यांचे सहकार्य लाभले. मीरा खालगावकर, प्रतिमा खानोलकर आणि स्वरदा महाबळ यांनी कार्यक्रमाची सूत्र सांभाळली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड