सुजाण वाचक हेच ग्रंथालयाचे खरे वैभव- ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : सुजाण वाचक हे ग्रंथालयाचे खरे वैभव आहे. हे वाचकच वाचन चळवळ वृद्धिंगत करत असतात. कोणत्याही ग्रंथालयाचे सुजाण व चौफेर वाचन करणारे वाचक आधारस्तंभ आहेत, असे गौरवोद्गार रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी काढले.

वाचनालयाच्या वतीने ग्रंथसखा पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. वाचनालयाने १९५ वा वर्धापनदिन आणि प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून २० वाचकांना ग्रंथसखा पुरस्कार देऊन गौरवले. मागील वर्षभराच्या कालावधीत वाचनालयात नियमित आलेल्या वाचकांमधून त्यांनी वाचलेल्या साहित्यानुसार तसेच विविध वयोगटानुसार या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

अॅड. पटवर्धन यांनी वाचनालयाच्या भविष्यातील योजनांची, वाचक चळवळीमधील आव्हानांची चर्चा केली. सर्व वाचकांनी आणि सर्व पुरस्कारप्राप्त वाचकांनी वाचक चळवळ वाढविण्यासाठी अधिकाधिक वाचक सभासद करण्याला वाचनालयाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिलीप घुडे, बजरंग भाटकर, डॉ. शाम जेवळीकर, वैशाली जोशी, डॉ. महेश पोखरणकर, किशोर मयेकर, सौरभा कांबळे, मनोज मनमाडकर, रामनाथ वारंग, संदीप सावरे, शांताराम शितप, शशिकांत भावे, नीलाक्षी डिंगणकर, जगदीश कीर, सीमा वीर, नील मुकादम, सात्त्विक मालंडकर, संदीप कडवेकर, मधुरा आठल्ये, राजश्री साने यांना पुरस्कार देण्यात आले. त्यांच्यापैकी डॉ. श्याम जेवळीकर, प्रा. सीमा वीर, सात्त्विक मालंडकर यांच्या वतीने विठ्ठल मालंडकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ग्रंथालयाबद्दल गौरवोद्गार काढले. हे ग्रंथालय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांपैकी एक आहे, असे आवर्जून सांगितले. अत्यंत दुर्मिळ असे ग्रंथ या वाचनालयात उपलब्ध आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष राजा प्रभू, कार्यवाह आनंद पाटणकर, सौ. मालती खवळे आणि कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर पटवर्धन यावेळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply