लिअरने जगावं की मरावं? : भावनांच्या कल्लोळाचं समर्थ दर्शन घडवणारं नाटक

साठावी राज्य हौशी नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : दिवस तिसरा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २४ फेब्रुवारीला सादर झालेल्या लिअरने जगावं की मरावं?`` या नाटकाचा हा परिचय… (नाटकातील एका प्रसंगाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

पडदा उघडतो, दारूची बाटली शेजारी ठेवून असीम भानू एकटाच बोलतोय. हा विदूषक आहे. याच्या संवादाचा प्रवेश संपताच पडद्याआडून आवाज येतो एका खटल्याच्या निकालाचा. अभिनेत्री अरुंधती शर्मा यांचा खून झाल्याच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलेला तो निर्णय होता. ‘उदयन नाट्यकला केंद्रा’चे मुख्य प्रशिक्षक आणि सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक विप्लव मुजुमदार यांच्यावर खून केल्याचा संशय होता, पण ठोस पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

रंगमंचावर हळूहळू मंद प्रकाश पसरतो, मुक्तता झालेल्या विप्लवचं स्वतःशीच बोलणं सुरू होतं – सुटूनही सुटता येतं? तो बोलत असतानाच दुसऱ्या बाजूने एक स्त्री प्रवेशते, ती हुंदके देत असते, विप्लव दचकतो. क्षणात ती दिसेनाशी होते, दुसरीच स्त्री दिसू लागते, “सर, सर, मी आहे योगिनी…! योगिनी व्यास, त्या प्रसंगाला कारणीभूत ठरलेली मी …..!” तो भानावर येतो, पण अस्वस्थच असतो. म्हणतो, “पक्षी बसण्याआधीच फांदी खचलेली असेल तर दोष पक्ष्याचा नाही. त्या घटनेच्या स्मृती पुसून टाकायच्यात. पुन्हा यायचंय, उभं राहायचंय!”

रत्नागिरीच्या ‘समर्थ रंगभूमी’ने सादर केलेलं साठाव्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील हे तिसरं पुष्प. जयंत पवार या नामांकित नाटककाराच्या लेखणीतून अवतरलेल्या या नाटकाचं नाव ‘लिअरने जगावं की मरावं?” एका नामांकित नाट्य प्रशिक्षण संस्थेतील प्रमुख प्रशिक्षक आणि एक यशस्वी, प्रथितयश दिग्दर्शक अशी ख्याती असलेल्या विप्लव मुजुमदार या कलाकाराची त्यात मध्यवर्ती भूमिका आहे, ती भूमिका आणि दिग्दर्शन यांची अवघड जबाबदारी पार पडली रत्नागिरीतीलच तरुण अभिनेता ओंकार प्रदीप पाटील यांनी.

फ्लॅशबॅकने मुख्य कथानक सुरू होतं. चर्चमधील प्रार्थनेसारखं दृश्य, एक युवती मध्यभागी थोड्याशा उंच मंचकावर उभी राहून इंग्रजी संगीत शैलीत गाऊ लागते. “मी पुन्हा स्वप्न बघू शकते का?” अशा आशयाचे शब्द आहेत. गाणं संपताच लढाई दाखवणारं नृत्य, एखाद्या ऑपेराचा सराव दिसतोय! “व्वा, व्वा! क्लासरूम प्रोडक्शन प्रॅक्टिस सुंदर!” प्रशिक्षक विप्लव मुजुमदारचा आवाज ऐकून विद्यार्थ्यांना आनंद होतो. मधल्या उंच पीठावर उभा राहून विप्लव बोलू लागतो, “आरंभम फेस्टिव्हल’मध्ये ‘किंग लिअर’ करायचं. मी स्वतः लिअरची भूमिका करणार!” असं म्हणून विद्यार्थ्यांना लिअरची गोष्ट सांगतो.

‘किंग लिअर’ हे शेक्सपिअरने १६०६ मध्ये लिहिलेलं नाटक. या राजाला तीन मुली आहेत. तिघींपैकी कोणाचं आपल्यावर सर्वाधिक प्रेम असेल तिला संपत्ती देण्याचं तो जाहीर करतो. मोठ्या दोघी आपण वडिलांवर अतिशय प्रेम करत असल्याचं नाटक करतात, धाकटी, राजाची लाडकी कॉर्डिलिया सांगते, “एका मुलीचं आपल्या पित्यावर असू शकतं तेवढं, जास्तही नाही, कमीही नाही!” राजा थोरल्या दोघींना संपत्ती देऊन टाकतो. कालांतराने त्याच राजाला घराबाहेर काढतात, अशी ही शोकांतिका. बे नाटक बसविण्याची आणि सादर करण्याची प्रक्रिया म्हणजे किंग लिअरनं जगावं की मरावं? हे नाटक.

तालमी सुरू होतात, लिअरची धाकटी मुलगी कॉर्डिलिया हिची भूमिका अरुंधती शर्माकडे देण्यात आली. वयाने अधिक असलेल्या अभिनेत्रीला सर्वात लहान बहिणीची भूमिका दिली हे अन्य विद्यार्थिनींना आवडत नाही, कोणी संचालकांकडे तक्रार करतात, कोणी संस्था सोडून जायला निघतात. या साऱ्या प्रकारात अरुंधती आणि विप्लव यांच्यात वाद निर्माण होतो, मला नाटकात काम करायची इच्छा नाही असं ती सांगते, तुझ्याशिवाय मी ‘लिअर’ करू शकतो, असं विप्लव म्हणतो. नाटक होतंदेखील. पण अरुंधतीशिवाय! आणि या गोष्टीनं विप्लवचा अहं दुखवतो.

मग अस्वस्थतेवरचं औषध म्हणजे दारू पिताना हळूहळू राजा लिअर त्याच्या मनावर कब्जा करू लागतो. त्यानं उत्तम वठवलेल्या भूमिकेतला राजा लिअर त्याला अरुंधतीविरोधात भडकवतो, “…..तिचा तेजोभंग कर. ठोठाव तिच्या घराचं दार. ठेव तिच्या हातात तुझ्या यशाची फुलं, कर तिचा धिक्कार !”

विप्लव तिच्या घराकडे जातो, यशाची धुंदी, दारूचा कैफ, अपमानाचा डंख आणि सूडाचा अग्नी यांनी घेरलेला विप्लव खालच्या पातळीवर जाऊन अरुंधतीला त्या दोघांच्यातील संबंधांच्या आठवणी सांगतो, बरबाद करण्याची धमकी देतो.
“जे बेभानपणे उधळून दिलं तुमच्यावर, त्याच्या निर्लज्ज खुणा सांगता? तुमची किंमत शून्य झाली आज…!” हे तिचं उत्तर ऐकून आत्यंतिक संतापलेल्या विप्लवचा तोल पुरता सुटतो, तिला ढकलून पाडतो, झटापट होते, तो तिला बांधून ठेवतो, दारू ढोसतो नि तिच्या अंगावरही ओततो, लायटर पेटवतो, विकट हसतो, अरुंधती ज्वालांनी वेढली जाते. विप्लव शुद्धीवर येतो, “अरु अरु माय गॉड हे काय केलं मी?”

आता याला काही अर्थ नसतो, पण मृत्युशय्येवरून तिनेच दिलेली साक्ष त्याची निर्दोष मुक्तता करण्यात महत्त्वाची ठरते.

मध्यंतरानंतर विप्लवचा आत्मक्लेश, विद्यार्थ्यांच्या चर्चा, संस्थेने नेमलेल्या समितीकडून चौकशी, अंगात भिनलेल्या लिअरबरोबर संवाद आणि अखेरीस पश्चात्तापाच्या आगीत तावून सुलाखून निघालेल्या विप्लवचं पुन्हा उभं राहणं….!

रुबाबदार लिअर राजापासून अरुंधतीपर्यंत सर्वच पात्रांच्या भूमिका छान वठल्या आहेत. विप्लव आणि अरुंधती यांच्यातील झटापट, भूमिका करताना मनात भिनलेल्या राजाशी होणारा संवाद, तालमीतला ऑपेरा, विद्यार्थी म्हणून काम करणाऱ्यांची कॅम्पसमधली बोलणी, दुःखाच्या आगीत होरपळणाऱ्या विप्लवला भेटायला येऊन पुन्हा त्याचा स्वीकार करायला तयार झालेल्या पत्नीच्या उत्कट भावना हे सारं प्रेक्षकांना जिवंत वाटण्यासारखं झालंय. चौकशी समितीतील सदस्यांचं बोलणं खऱ्याखुऱ्या समितीसारखं, त्यातल्या या सदस्य महिलेचं टिपण पॅड छातीशी धरून बसणं, संस्थेच्या बदनामीबद्दल कोठारीच्या मनात निर्माण झालेली चीड आणि बॅनर्जी या मुख्य सदस्याची धोरणी भाषा बरोबर सादर झालीय. लिअरच्या भूमिकेत असणारे कवितेसारख्या ओळींचे संवाद, आसनावर बसलेल्या राजाचा रुबाब आणि भावनांच्या कल्लोळात भोवऱ्यासारखा गरगरणारा विप्लव यांच्याइतकाच अगदी कमी वेळा रंगमंचावर येणारा विदूषकही लक्षात राहतो.

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी (९९६०२४५६०१)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply