खुराडं : नवीन पिढीतील विवाहितांनी पाहावंच असं नाटक

साठावी राज्य हौशी नाट्य स्पर्धा : रत्नागिरी केंद्र : चौथा दिवस

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २५ फेब्रुवारीला सादर झालेल्या `खुराडं` या नाटकाचा हा परिचय… (नाटकातील एका प्रसंगाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

मध्यमवर्गीय कुटुंबाच्या फ्लॅटच्या आतील दृश्य, डाव्या बाजूला स्वैंपाकघर, उजव्या बाजूला उठण्याबसण्याची खोली. ‘ती’ आणि ‘तो’ दोघांचा राजाराणीचा संसार, मजा आहे!

पडदा उघडतो तेव्हा ‘तो’ – विनीत त्याचं नाव- फोनवर बोलत बसलाय, कुणाशी बोलतोय कुणास ठाऊक, पण बोलता बोलता पूर्वीचे दिवस आठवतो, प्रेयसीबरोबर केलेलं नृत्य वगैरे (त्यात क्षणभर ‘ती’ रंगमंचावर येऊन त्याच्यासोबत नाचून जाते. कविमनाचा दिसतोय हा विनीत!) थांबा, एवढ्यातच निष्कर्ष नको, पाहूया पुढे.

थोड्या वेळाने मित्र समीर येऊन जातो. तो संघटनेचं काम करतो. विनीतची पत्नी अरुंधती घरात नाही, तिच्या हातची कॉफी मिळणार नाही, म्हणून हळहळून समीर जातो. तिच्या हातच्या कॉफीची चव आवडल्यानेच विनीत तिच्या प्रेमात पडला, पुढे दोघांनी लग्नही केलं. पुन्हा एकदा विनीत त्या सगळ्या जुन्या आठवणीत रंगून जातो. इतक्यात ‘ती’ येते, अरुंधती तिचं नाव. जुजबी बोलून ती आत जाते, विनीत एकटाच बोलत प्रेमालापात रंगतो.

ती ऑफिसमधून दमून आलेली असते. तिने न मागताच तो तिला कॉफी आणून देतो. तिचं बोट भाजतं, त्याला पहिल्या भेटीत जिभेला बसलेला चटका तिला आठवतो, झाsssलं, परत एकदा मागचे दिवस! दोघं कॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणीत रमतात. पाऊस पडत होता त्याची आठवण……!

आर्या प्रकाश शेट्ये नावाच्या तरुण मुलीने ही अरुंधतीची भूमिका केलीय. जलधारांमध्ये न्हाऊन जाण्याचा, गारठून जाऊन ओलेत्याने त्याला बिलगण्याचा अभिनय तिनं छान केलाय. काही क्षणातच हे आठवणींचं गारूड उतरतं. ती आत जाते, किचनमध्ये पसारा. तो आवरत असतानाच ती चिडून विचारते, “लाइटबिल भरलंस का?” तो गांभीर्याने घेत नाही. तो रोमँटिक, ती व्यवहारी दिसते, ती संघटनेच्या कचेरीत नोकरी करते. तो बेकार आहे वाटतं! असेलही. प्रेक्षकांच्या मनात येऊन जातं, मघाशी ती कॉफी एकटीच प्याली, तू नाही घेत असं विचारलं नाही. सहसा विचारतो ना आपण! हा काही कामधंदा करत नसावा, घर तीच चालवते बहुधा असं तुमच्या मनात येतं, पण तसं नाही हे त्यांच्या बोलण्यावरून उमगतं.

  "तू मला समजून घेत नाहीस,"
  "काय समजून घेऊ?"
  "केव्हा तरी वेळ देतेस मला? ऑफिसमध्ये बॉसची कटकट, घरी आल्यावर तुझी!"
   तो अॅप्रन बांधून स्वैंपाकघरात काम करतो. वाद चालूच
   तो- बघावं तेव्हा संघटना, मित्रमैत्रिणी, क्षुल्लक गोष्टीवरून अकांडतांडव करते.
   ती - बघावं तेव्हा मित्रमैत्रिणी, दारूच्या पार्ट्या

(मनातली चिडचिड दोघे दोन टोकांना राहून स्वगत बोलतात, हा प्रवेश चांगला वठलाय.)

तो स्वैपाकघरात काम करतो, ती संगणकावर. पूर्वी नोकरी करणाऱ्या स्त्रिया घरी आल्याबरोबर पदर बांधून कामाला लागत, नवरे आरामात बसत. अजूनही बहुसंख्य स्त्रिया घरी आल्यावर गृहिणीच्या भूमिकेत शिरतात, मात्र ‘खुराडं’मधली नायिका नवरा नोकरी सांभाळून घरात काम करतोय, तरीही असमाधानी आहे. (‘बायकांनीच तेवढं राबायचं का’ यासारखे प्रश्न कृपया इथे आणू नयेत, हे लेखन नाटकाच्या कथानकाच्या अंगाने चाललंय.)

चिडचीड होते खरी, पण धागा तुटायला नको असं त्याला वाटतंय, काहीतरी चुकतंय हे तिलाही पटतंय. दोघांनाही एकमेकांसाठी वेळच द्यायला मिळत नाही ही खंत. दोघांनाही आपण समजून घ्यायला हवं हे वाटत राहतं.

दुसरा दिवस. तयार होतात, ती दोघांचा चहा करते, परस्परांना सॉरी म्हणतात. रोमँटिक होतात. हरवून जातात, काय चुकतंय त्याची चर्चा करतात. चार दिवस सुटी घेऊन फिरायला जाण्याचा बेत आखतात. तो मित्राला फोन करून फार्महाऊस बुक करायला सांगतो.

रंगमंचावर तांबडा प्रकाश टाकण्याचं प्रमाण वाढलंय..

मध्यंतरानंतर हिल स्टेशनवर येतात, रिसॉर्टमध्ये मुक्काम, तिला तिथला परिसर आवडतो. “किती छान आहे इथलं जग!” एवढ्यात दोघे ग्रामस्थ दारू पिऊन येतात, त्यातला एकजण अंगापिंडाने थोराड, अण्णा म्हणतात त्याला- हॉटेलमध्ये स्वैंपाकिणीचं काम करणारी वत्सला त्याची पत्नी, तिला बाहेर बोलावतो. तो दारू ढोसून आला म्हणून भांडण, तिचा आरडाओरडा, रडारड, तो लाथाबुक्क्यांनी मारतो, अरुंधतीला बघवत नाही, ती सोडवायला जाऊ पाहते, हॉटेलमधली मुलगी अडवते. “अहो मॅडम, हे नेहमीचंच!”
“नेहमीचंच?” अरुंधती धावत जाऊन त्या दारूड्याला दूर ढकलते. बाईला आधार देऊन उठवते. अण्णा रागावतो, एका रपट्यात आडवी करीन, हे बघताच विनीत धावत येतो, त्याला हाकलून तिला नेऊ पाहतो.

बाई समजूत घालते, इथल्या सगळ्या बायकांची हीच परिस्थिती, जन्मभर हेच चाललंय. हे खुराडं हाय.

विनीत अरुंधतीवर चिडतो. तू कशाला मध्ये पडतेस? किती छान मूड होता, गोंधळ घातलासच, नेहमीसारखा. तुला माझी गरजच नाही! थोड्या वेळाने तिला सॉरी म्हणतो. दरम्यान ती फोन करून आपल्या शहरातील मित्रमंडळीला इथली परिस्थिती सांगून टीम घेऊन बोलावते. पुन्हा त्याचा वैताग! त्यातच ती त्याला सॅनिटरी पॅड आणायला सांगते. सहलीच्या विचक्याच्या कल्पनेने तो वैतागतो… चिडचिड करतो.

    "त्यापलीकडे आपलं काहीच नाही का रे?" तिचा प्रश्न.
   "तुझं प्रेमच नाही माझ्यावर" त्याचा त्रागा. त्याच्या संकुचित विचारांची तिला शिसारी येते. "असं असेल तर मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही, वेगळे होऊया आपण."..... मगअस्वस्थ रात्र.

सकाळची वेळ, दारूड्या येतो, आता छान आहे. वत्सला येते, विचारपूस करते. दोघं प्रेमाने बोलतात. “काल तुझ्यासाठी शेवपापडी आणली होती,” अण्णा माफी मागायला अरुंधतीकडे येतो. विनीत येतो, “तुम्ही इथे कशाला आलेले?” अण्णा माफी मागतो.

ते दोघे नि त्या दोघी बोलू आपसांत बोलतात. दोघांचंही कौन्सिलिंग होतं. “अण्णा, इथं आलो आणि आनंदी जीवनाचा मार्ग सापडला मला”- विनीत

“नातं टिकवायचं म्हणल्यावर तडजोडी करायला पायजेत की नाय? घर, संसार बाईलाच सांभाळायचा असतो” वत्सलाचं म्हणणं अरुंधतीला पटतं. शेवट गोड होतो.

रत्नागिरीच्या ‘संकल्प कलामंच’ने सादर केलेलं ‘खुराडं’ नावाचं हे नाटक लिहिलं होतं ज्ञानेश्वर कृष्णा पाटील यांनी. दिग्दर्शन गणेश गुळवणी यांचं. नाटकाची मांडणी नीटनेटकी, सुरुवातीला काही वेळ ते खूप रेंगाळतंय असं वाटतं, पण मग स्टेशन सोडल्यावर गाडीला येते तशी हळूहळू गती मिळते. नव्या संसाराचं दृश्य नेपथ्यातून लक्षात येतं. अरुंधतीच्या भावमुद्रा, संतापाने थरथरणं, वत्सलाची मध्यमवयीन ग्रामीण बाई, दारूड्या अण्णाचं शुद्धीवर आल्यावरचं शहाणपण हे सारं दाद देण्याजोगं!

  • राजेंद्रप्रसाद मसुरकर, रत्नागिरी (९९६०२४५६०१)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply