संगीत नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका शनिवारपासून उपलब्ध

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा येत्या १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका शनिवार, ५ मार्चपासून उपलब्ध होणार आहेत.

हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला असून स्पर्धा चुरशीची होणार आहे.

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या या संगीत नाट्य स्पर्धेला नेहमीच रत्नागिरीतील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. यात तरुण वर्गाबरोबर वृद्ध प्रेक्षकदेखील तितक्याच आवडीने ही नाटके पाहायला येत असतात. म्हणूनच रत्नागिरी केंद्रावरील प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून यावर्षीदेखील संपूर्ण नाट्य महोत्सवाचे एकत्रित सीझन तिकीट रसिक प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. शनिवार, ५ मार्चपासून सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेमध्ये सीझन तिकिटे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उपलब्ध होणार आहेत.

आयोजकांकडून ४५० सीझन तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला एका वेळी फक्त जास्तीत जास्त ३ तिकिटे घेता येतील. रत्नागिरीतील संगीतप्रेमी रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १० मार्च ते २७ मार्च या कालावधीत १२ मार्चचा अपवाद वगळता दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. स्पर्धेदरम्यान १५ मार्च आणि २६ मार्च रोजी नाट्यप्रयोग होणार नाही.

स्पर्धेचा तपशील (तारीख, नाट्यसंस्था, नाटक, लेखक आणि दिग्दर्शक या क्रमाने) :
१० मार्च – अखिल चित्पावन ब्राम्हण विद्यार्थी सहाय्यक संस्था, रत्नागिरी, कट्यार काळजात घुसली, लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर, दिग्दर्शक : वामन जोग.
११ मार्च – अमृत नाट्य भारती, मुंबई (मराठी साहित्य संघ, मुंबई), धाडिला राम तिने का वनी, लेखक : द. ग. गोडसे, दिग्दर्शन : पं. अरविंद पिळगावकर.
१२ मार्च (रात्री ९.३० वाजता) – दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली, गोपिकारमणु स्वामी माझा, लेखक : विलास कर्वे, दिग्दर्शक : विलास कर्वे.
१३ मार्च -अस्तित्व मेकर्स फाउंडेशन, सोलापूर, संगीत स्वप्नवासवदत्तम्, लेखक : सुहास वाळुंजकर, दिग्दर्शक : बळवंत जोशी.
१४ मार्च – क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी, संगीत मत्स्यगंधा, लेखक : वसंत कानेटकर, दिग्दर्शक : बाळ पुराणिक.
१६ मार्च – कलारंग नाट्यप्रतिष्ठान, खंडाळा, ता. जि. रत्नागिरी, मत्स्यगंधा, लेखक : प्रा. वसंत कानेटकर, दिग्दर्शक : नितीन जोशी.
१७ मार्च – खल्वायन, रत्नागिरी. ययाति आणि देवयानी, लेखक : वि. वा. शिरवाडकर, दिग्दर्शक : मनोहर जोशी.
१८ मार्च – आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी, देवमाणूस, लेखक : नागेश जोशी, दिग्दर्शक : संदीप थोरात.
१९ मार्च – श्री ओंकार थिएटर्स, गोवा, कट्यार काळजात घुसली, लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर, दिग्दर्शक : अनिल आसोलकर.
२० मार्च – परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई, सुवर्णतुला, लेखक : विद्याधर गोखले, दिग्दर्शक : घनश्याम जोशी.
२१ मार्च – कामगार अधिकारी कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, मुंबई, संगीत पंढरपूर, लेखक : जगदीश दळवी, दिग्दर्शक : वैशंपायन.
२२ मार्च – संक्रमण, पुणे, आरंभी स्मरितो पाय तुझे, लेखक व दिग्दर्शक : यतिन
माझिरे.
२३ मार्च – सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा, विठू आलो माहेरा, लेखक : महादेव हरमलकर, दिग्दर्शक : अनिल आसोलकर.
२४ मार्च – मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, मोरजी, पेडणे, गोवा. शिक्का कट्यार, लेखक : यशवंत नारायण टिपणीस, दिग्दर्शक : साबाजी गं. च्यारी.
२५ मार्च – श्रुती मंदिर, सोलापूर, सूर-साज, लेखक व दिग्दर्शक : श्रीमती विद्या काळे.
२७ मार्च – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, तुका म्हणे आता, लेखक : पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक : रघुनाथ कदम.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply