राष्ट्रीय योग विज्ञान शिबिरांच्या प्रारंभासाठी रामदेवबाबा ९ मार्चला रत्नागिरीत

रत्नागिरी : करोनापश्चात मानसिक आणि शारीरिक बळ देण्याकरिता योग सर्वांत महत्त्वाचा आहे. योगाचा प्रसार होण्याकरिता क्रांतिकारकांची भूमी रत्नागिरीतून राष्ट्रीय पातळीवरील योग विज्ञान शिबिरांचा प्रारंभ स्वामी रामदेवबाबांच्या उपस्थितीत येत्या ९ मार्च रोजी करण्यात येणार आहे. ही माहिती भारत स्वाभिमान ट्रस्टचे राज्य प्रभारी बापूसाहेब पाडाळकर आणि पतंजली योगपीठ (हरिद्वार) महिला केंद्रीय प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेली सुमारे २० वर्षे हरिद्वार येथील पतंजली योगपीठाद्वारे रामदेवबाबांनी योगाचा देश-विदेशात योग शिबिरांद्वारे प्रसार केला. सध्या करोना काळ, सलग दोन वर्षे चक्रीवादळे, नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांच्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या व्याधींपासून मुक्त करण्याकरिता योग विज्ञान शिबिरे मोठ्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात रत्नागिरीतून होणार आहे. रामदेवबाबा ८ मार्चला सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीत येणार असून लोकमान्य टिळक जन्मस्थान, पतितपावन मंदिर, स्वा. वीर सावरकर स्मारकाला ते भेट देणार आहेत. ९ तारखेला पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिला, पुरुष, विद्यार्थ्यांसाठी योग शिबिराला सुरवात होईल. त्यांच्यासोबत स्वामी परमार्थ देव, स्वामी आनंददेव आहेत.

याच दिवशी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्यविषयक टिप्स, मुलांवर चांगले संस्कार व आनंदी निरोगी परिवार या त्रिसूत्रीय विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात महिला मेळावा होईल. मेळाव्याला स्वामी रामदेवबाबा, पतंजली विश्वविद्यालयाच्या डीन, महिला मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. देवप्रिया यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी यांची पत्नी सौ. पाटील यांच्यासह निमंत्रित महिलांना व्यासपीठ दिले जाणार आहे. योग शिबिर आणि महिला मेळाव्याच्या नियोजनाकरिता रत्नागिरीतील पतंजली योग समितीसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी रत्नागिरीत मेहनत घेत आहेत.

स्वामी रामदेवबाबा १० वर्षांनंतर रत्नागिरीत येत आहेत. त्याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत यांचे बहुमोल सहकार्य लाभत असल्याचे सुधाताईंनी सांगितले. रत्नागिरी एसटी विभागाशी झालेल्या चर्चेनुसार ९ मार्चला पहाटे ३ वाजल्यापासून योग शिबिराला येणाऱ्यांकरिता जाण्या-येण्याकरिता मोफत एसटी सुविधा ठेवली आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्व मार्गांवरून एसटीच्या बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. एसटीकरिता नोंदणी करण्यासाठी ७ मार्चला सायंकाळपर्यंत ९७३००६९७११ आणि ९५७९७७७६०३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

योगाला येण्याऱ्या महिला, पुरुषांची बैठक व्यवस्था केली आहे. मात्र आसन, पाणी बाटली, चप्पल ठेवण्याकरिता कापडी पिशवी सोबत आणावी. गाड्या पार्किंगसाठी क्रीडांगणाच्या मागील बाजूला व्यवस्था केली आहे.

रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला महिला पतंजली योग समिती राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अॅड. विद्यानंद जोग यांच्यासह नगरसेविका शिल्पा सुर्वे व पतंजली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply