‘अपरान्त’ नावाचं अॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेलं पुस्तक ९ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाविषयी.
………………………….

अपरान्त म्हणजे कोकण, भारतभूमीतील पश्चिमेचा प्रदेश. भारतीय संस्कृतीत ज्याला साक्षात विष्णूचा अवतार मानलं जातं त्या भगवान परशुरामाने निर्मिलेला चिंचोळा पण अत्यंत रमणीय भूप्रदेश. अनेक बुद्धिमंतांची, कलावंतांची, पराक्रमी स्त्री पुरुषांची जन्मभूमी. इथली माणसं मेहनती पण आळशी, दरिद्री असूनही दिलदार, प्रामाणिक असली तरी कामात खूपशी मागे, बुद्धीने चलाख, शरीराने काटक आणि स्वभावाने सरळ. पण डोंगर आणि सागराच्या मध्ये लांबचलांब पसरलेला हा भूपट्टा सुरुवातीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिला. ‘कोकणचा कॅलिफोर्निया करण्या’ची घोषणा झाल्याला साठ वर्षं लोटली, परंतु कॅलिफोर्निया सोडाच, बेसुमार तोड झालेली जंगलं आणि ओस पडत चाललेली खेडेगावं हे कोकणचं आजच भेसूर रूप आहे. अशा या भूप्रदेशाच्या गतकाळाचा मागोवा घेत वर्तमान परिस्थितीच्या कित्येक पैलूंचा धांडोळा ‘अपरान्त’मध्ये घेण्यात आला आहे.
हे पुस्तक म्हणजे पाटणे यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह आहे. यातील बहुतेक लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रकाशित झाले होते. एकूण अठ्ठावीस लेखांतून त्यांनी कोकणाचा वैभवशाली इतिहास, काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरं झालेली रत्नागिरी, मच्छीमारी व्यवसायाची वास्तव स्थिती, कोकणात स्वतंत्र विद्यापीठाची गरज, कोकण रेल्वेचा विकास आणि महामार्गांचा रखडलेला विकास, प्रत्यक्षात येत नसलेले ‘प्रस्तावित’ प्रकल्प अशा विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. फळप्रक्रिया उद्योग, क्रूझ पर्यटन यांत दडलेली विकासाची ताकद, स्पर्धा परीक्षा कोकणात रुजविण्यासाठी चळवळ होण्याची गरज, प्रशिक्षण आणि संधींची आवश्यकता, पर्यटन आणि मत्स्य व्यवसायांना अनुकूल ठरणारा नवीन ‘सीआरझेड’ कायदा अशा बऱ्याच बाबींचा ते ऊहापोह करतात.
‘अपरान्त’ या पुस्तकाचा प्रारंभ होतो तो कोकणच्या पदरात न्याय पडला नाही या वस्तुस्थितीच्या मांडणीने. इतिहासात हजारो वर्षं वैभवशाली बंदरांतून आंतरराष्ट्रीय व्यापार चालणाऱ्या, अभेद्य किल्ल्यांनी सुरक्षित बनलेल्या आणि शिवछत्रपतींनी राजधानी वसविलेल्या कोकण भूमीला ब्रिटिशांनी ‘मजूर पुरविणारा प्रदेश’ बनवलं, स्वातंत्र्योत्तर काळात तर महानगरी क्षेत्र वगळता उर्वरित कोकणात दोनतीन टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली नाही, ही परिस्थिती विस्तारपूर्वक मांडली आहे.
असं असलं तरी पाटणे यांच्या लेखनाचा रोख नकारात्मक नाही, सूर तक्रारीचा नाही. केवळ टीकात्मक लेखन म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. येथे येऊ पाहणारी पण अनिश्चिततेच्या भोवऱ्यात गरगरत राहिलेली रिफायनरी, सामूहिक प्रयत्नांतून शालांत परीक्षांच्या यशस्वितेचा ‘कोकण पॅटर्न’, खाड्यांच्या परिसरात दडलेली पर्यटक आकर्षून घेण्याची क्षमता याबद्दल आकडेवारीसह ते तपशिलवार लिहितात. त्याचवेळी, कोयनेच्या वाया जाणाऱ्या अवजलाच्या अंगी, उन्हाळ्यात पाणी पाणी करणाऱ्या या प्रदेशाची तहान भागविण्याची असणारी क्षमता, महामार्ग, रेल्वे आणि बंदर विकासातून होऊ शकणारा कोकण विकास यावर बारकाईने लिहितात. ‘फसवी मंडळे’ ‘मासे कोकणात आणि मत्स्यविद्यापीठ नागपुरात’, ‘जैतापूरची बत्ती लागणार कधी’ इत्यादी लेखांतून कोकणावर झालेला अन्याय आणि कोकणाच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष यांवर ते प्रकाश टाकतात.
हे पुस्तक न झालेल्या किंवा वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रादेशिक विकासाबद्दल आणि या प्रदेशातील जनतेची व्यथा मांडण्यासाठी लिहिलेलं असलं तरी त्यातील भाषेत आक्रस्ताळेपणा नाही, द्वेषाने भरलेली टीका नाही. अनेक तपशील आणि मुद्देसूद मांडणी असूनही कसं तोंड बंद केलं हा अभिनिवेश नाही. या पुस्तकाला विवेचक प्रस्तावना देणारे कोकणाचे अभ्यासू नेते खासदार सुरेश प्रभू यांनी ‘अभ्यासपूर्ण, नेमकं आणि योग्य वेळी केलेलं सोप्या शब्दांतील लेखन’ असा अभिप्राय दिला असून अशा प्रकारच्या लेखनाची कोकण विकासाकरिता गरज असल्याचं नमूद केलंय.
पुस्तकाची सुबक छपाई कोल्हापूरच्या ‘राजहंस’ मुद्रणालयाने केलीय. झाडाखाली उभं राहून झावळ्यांच्या मधून लटकणारे नारळाचे घोस दाखवणारं मुखपृष्ठावरचं चित्र पाहून ‘उंची माडांची जवळून मापवा’ या गीताच्या ओळी आठवतात. त्या झावळ्यांच्या मधून डोकावणाऱ्या निळ्याशार आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता कोकणी माणसाकडे आहे, त्याला प्रेरणा देण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
- राजेंद्रप्रसाद स. मसुरकर, रत्नागिरी
- (९९६०२४५६०१)


मला हे पुस्तक पाहिजे मोबा 9881559043
प्रा. संजयकुमार कांबळे उद्या आणि परवा. मी रत्नागिरीला येत आहे.