अपरान्त म्हणजे कोकणच्या प्रश्नांवरील सर्वसमावेशक पुस्तक – श्रीपाद नाईक

रत्नागिरी : अपरान्त म्हणजे कोकणाचा इतिहास ते आजच्या समस्या यांचा समग्र आढावा घेणारे सर्वसमावेशक पुस्तक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन, बंदर व जलवाहतूक मंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे केले.

अॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. पुस्तकातील विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखांचा त्यांनी थोडक्यात परामर्श घेतला. कोकणाच्या समस्या मांडताना लेखकाच्या भाषेत कोठेही आक्रस्ताळेपणा दिसत नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. विकासाची गती वाढली पाहिजे, कोकणातून लवकर प्रस्ताव आले पाहिजेत, असे ते म्हणाले.

प्रकाशन सोहळ्याचा प्रारंभ लेखक विलास पाटणे यांच्या भाषणाने झाला. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ, मासे मिळतात त्या कोकण प्रदेशातच मत्स्य विद्यापीठ असण्याची गरज, जल पर्यटनासाठी छोट्या नौकांना अर्थसाह्य देण्याची आवश्यकता अशा मुद्द्यांना स्पर्श करत त्यांनी अत्यंत परखड पण संयत शब्दांत कोकणाच्या कागदावर राहिलेल्या विकासाचा समाचार घेतला. जो ‘कॅलिफोर्निया’ कोकणाचे उद्दिष्ट ठेवले, त्या प्रदेशात एकोणीस रिफायनरी आहेत आणि कोकणात त्याच प्रकल्पांना विरोध केला जातो हा विरोधाभास त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडला.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याने प्रगत आणि स्वावलंबी झालेल्या जपान आणि तैवान या लहानशा देशांनी जगाला आपले सामर्थ्य दाखवून देणाऱ्या लहान देशांचे उदाहरण देत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, आपला विकास आपणच करणार आहोत हे आत्मविश्वास देण्याची गरज आहे. शिक्षण झाल्यावर काही काळ प्रत्येकाने आपल्या गावात काम करण्याची गरज त्यांनी सुचविली. स्वस्त विजेचा अखंड पुरवठा हे जगातील प्रगत राष्ट्रांच्या समृद्धीचे गमक असल्याचे ते म्हणाले. ही गोष्ट अणुविद्युत निर्मितीने साध्य होईल, असे ते म्हणाले. स्थानिक माणसे उपलब्ध नसल्यामुळे दूरच्या प्रदेशांतून येणाऱ्या कामगारांपैकी पुष्कळजण ड्रग्जचा चोरटा व्यापार, दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या गुन्हेगारी कामाशी संबंधित असतात, समुद्रकिनारी प्रदेशाचा वापर देशविघातक कृत्यांसाठी केला जातो. यासाठी संपूर्ण महामार्गावर छुपे कॅमेरे बसविण्यात यावे असे दीक्षित म्हणाले.

‘कोकणाच्या दृष्टीने काही अपेक्षा व्यक्त करण्याचा कार्यक्रम’ अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपले भाषण सुरू केले. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारी रिफायनरी बारसू येथे होणार असेल तर लोकहिताचा विचार करता तिला विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोयना अवजलाचा कोकणासाठी वापर करण्यासाठी राबवावयाच्या योजनेसाठी राज्य आणि केंद्रा सरकारांनी एकत्र आले पाहिजे, त्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी श्रीपाद नाईक यांनी केले. कोकणाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे ते म्हणाले. कोकणातून उच्च पदावरील प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी निर्माण व्हावे, याकरिता मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मार्गदर्शन उपक्रमासाठी पंचवीस लाख रुपये निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरीचे दानशूर सुपुत्र श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्याचे कार्य या उपकेंद्रात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘लोकमान्य मार्टिपर्पज सोसायटीच्या विभागीय व्यवस्थापक लक्ष्मीकांत खेडेकर यांनी राज्यातील सर्व आमदारांना देण्यासाठी मंत्री श्री. सामंत यांना प्रतीकात्मक म्हणून या पुस्तकाची प्रत भेट दिली. राज्याचे माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी कार्यक्रमाला मुंबईहून शुभेच्छा दिल्या.

समारंभाच्या व्यासपीठाचे नेपथ्य, पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे कलाकार, प्रकाशक तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या पूर्वा पेठे यांचा वक्त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शहर वाचनालयाच्या अध्यक्षा मोहिनी पटवर्धन यांनी आभार मानले. समारंभाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply