वृत्तपत्रांनी लोकशिक्षणाचे काम व्रत म्हणून सुरू ठेवावे –  भगतसिंग कोश्यारी

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये वृत्तपत्रांचा खूप मोठा सहभाग आहे. अत्यंत खडतर काळापासून अत्याधुनिक सोयीसुविधांपर्यंत वृत्तपत्रांचे स्थित्यंतर झाले आहे आणि यापुढेही ते होत राहणार आहे. पण लोकशिक्षणाचे काम वृत्तपत्रांनी यापुढेही व्रत म्हणून केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीच्या बलवंत या शतकमहोत्सवी साप्ताहिकाच्या नव्या स्वरूपातील अंकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७ एप्रिल) मुंबईत राजभवनात झाले. त्यावेळी ते बोलत होते. शंभराव्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरीच्या बलवंत साप्ताहिकाची वाटचाल पुढे शतकानुशतके अखंडपणे सुरू राहो. त्यासाठी सुरेंद्रनाथ माने आणि सौ. माधवी माने यांना उत्तम बळ मिळो, अशा सदिच्छा राज्यपालांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की, माध्यम क्षेत्रातील क्रांतीमुळे साप्ताहिके बंद होत असताना साप्ताहिक बलवंत स्थापनेची शताब्दी साजरी करीत आहे. तसेच ते नव्या आणि डिजिटल रूपात वाचकांपुढे येत आहे, याचा आनंद वाटतो. हे एक धाडसच असून त्यासाठी मी बाळ माने व माधवी माने यांचे अभिनंदन करतो.

साप्ताहिक बलवंत स्वातंत्र्यपूर्वकाळात सुरू झाले. त्याकाळात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी काम करणे जोखमीचे होते, असे सांगून राज्यपालांनी हे कार्य निष्ठेने केल्याबद्दल संस्थापक पटवर्धन यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. वृत्तपत्रांना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात खूपच महत्त्व आहे. बलवंत साप्ताहिक जेव्हा १९२३ साली पटवर्धन यांनी सुरू केले, तेव्हा त्यांच्यासमोर खूप अडचणी असणार यात शंका नाही. पण तेव्हा त्यांनी ते नेटाने सुरू केले आणि चालविले. आता वृत्तत्रांचे तंत्रज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. त्यातून पूर्वीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत, पण वृत्तपत्र चालविणे ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच वृत्तपत्रे अडचणीत असल्याच्या आत्ताच्या काळात माने यांनी साप्ताहिकाचे स्वरूप बदलून ते नव्या स्वरूपात प्रसिद्ध करणे, डिजिटल आवृत्ती सुरू करणे हे मोठे जिद्दीचे आणि धाडसाचे आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आपल्याला शक्य होईल तोपर्यंत त्यांनी हा भार पेलावा आणि वृत्तपत्राचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत. एखादे साप्ताहिक ठराविक विचारधारेचे असले, तरीही ते एकांगी होऊ नये. साप्ताहिकाने आपला निष्पक्षपातीपणा कायम ठेवला, तर लोक त्याचा आदर करतील, असे राज्यपालांनी सांगितले.

प्रारंभी सुरेंद्रनाथ यशवंत ऊर्फ बाळ माने यांनी प्रास्ताविकात साप्ताहिक बलवंतच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. बलवंतची स्थापना १९ ऑक्टोबर १९२३ रोजी विजया दशमीच्या दिवशी झाली होती. कै .गजानन पटवर्धन यांनी स्वातंत्र्यजागृतीसाठी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून बलवंत साप्ताहिकाची सुरुवात केली होती, असे सांगून श्री. माने म्हणाले की, हे साप्ताहिक १९९५ सालापासून मी चालविण्यासाठी घेतले. साप्ताहिकाला आता ९९ वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत टॅब्लॉइड आकारात प्रसिद्ध होणारे हे साप्ताहिक आता वाचकांसाठी उपयुक्त ठरेल अशा ब्रॉडशीट आकारात प्रसिद्ध होत आहे. नव्या आकारातील साप्ताहिकात वैविध्य असणार आहे. त्यातील चार पाने रंगीत तर चार ब्लॅक अँड व्हाइट असतील. स्वातंत्र्याची परंपरा स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेल्या या साप्ताहिकातून यापुढेही देशाच्या हिताच्या घटनांना आणि विचारांना स्थान दिले जाणार आहे. केवळ बातम्या देण्याऐवजी त्यातून काही विचार देण्याचा प्रयत्न केला जाणार आाहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नव्या आवृत्तीचे आणि ऑनलाइन आवृत्तीचे प्रकाशन होणे मोठे भाग्याचे आहे.

नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक बलवंतचे सल्लागार अविनाश पाठक यांनी साप्ताहिक बलवंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. काळानुरूप झालेली स्थित्यंतरे अंगीकारून या साप्ताहिकाने पुढे वाटचाल सुरू केली आहे. एका ध्येयाने सुरू असलेली ही वाटचाल पुढे वर्षानुवर्षे सुरू राहील, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. नव्या साप्ताहिकात काही विचार देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार अॅड. आशीष शेलार म्हणाले की, आमदार म्हणून मी श्री. माने यांची वाटचाल पाहिली आहे. कोकणातील प्रश्न मांडण्याची कळकळ मला माहीत आहे. बलवंत साप्ताहिकाच्या माध्यमातूनही त्यांची ही कळकळ दिसेल, यात शंका नाही. देशाचा अमृत महोत्सव सुरू असताना बलवंतने साप्ताहिक शंभराव्या वर्षात पदार्पण करणे आणि नव्या स्वरूपात त्याचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन होणे हा निव्वळ योगायोग नाही.

रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित झोपाळ्यावरची गीता पुस्तकाचे अवलोकन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते नव्या स्वरूपातील बलवंत साप्ताहिकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच साप्ताहिकाच्या आवृत्तीचेही प्रकाशन त्यांनी केले. यावेळी पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केलेले आणि त्यातही बलवंतसाठी आजही कार्यरत असलेले रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, दहा हजाराहून अधिक शब्दकोडी तयार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले अवलिया प्रसन्न कांबळी, प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेले आणि अलीकडेच बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळालेले पत्रकार प्रमोद कोनकर, वैद्य शशिशेखर वझे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. कोनकर यांच्या झोपाळ्यावरची गीता पुस्तकाच्या इंग्रजीतील ई-बुकचे प्रकाशन, ज्येष्ठ पत्रकार सुदेश शेट्ये यांच्या कोकण टुडे कातळशिल्प विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. साप्ताहिक बलवंतच्या मालक, मुद्रक, संपादक आणि प्रकाशक सौ. माधवी माने यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी माने यांचे दोन्ही सुपुत्र विराज आणि मिहिर सुरेंद्रनाथ माने, पत्रकार प्रकाश वराडकर, पुण्याच्या अद्वैत फीचर्सचे मंगेश पाठक, पत्रकार किशोर आपटे, रत्नागिरीतील वितरक अरीफ काझी, आयटी आणि डिजिटल मीडिया सल्लागार मंदार जोशी, पनवेल येथील मुद्रक दलविंदरसिंद बाजवा, सिद्धेश सुरेश आलीम आदी उपस्थित होते.

अजय गोखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छायाचित्रण आणि ध्वनिचित्रमुद्रण केले. राज्यपालांचे अतिरिक्त खासगी सचिव कमल घिलडीयाल यांचे या छोटेखानी प्रकाशन समारंभासाठी विशेष सहकार्य लाभले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply