बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन!

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.
………………………
‘सामान्य कोकणी माणसाचे, भारतीय संसदेच्या गर्भगृहातील असामान्य तेजाचे दर्शन’ म्हणजेच आपल्या कोकणवासीयांचे बॅ. नाथ पै! २५ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. ‘लोकशाहीच्या या पंढरीनाथाचा’ जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या निसर्गसंपन्न गावात झाला आणि १८ जानेवारी १९७१ रोजी बेळगाव मुक्कामी ‘बेळगावच्या मराठी बांधवांवर होणारा अन्याय मी कदापीही सहन करू शकत नाही. त्यांना मुक्ततेचा प्रसाद आणून देण्यासाठी अखेरपर्यंत धडपडेन,’ असे वचन देत असताना तो देवाघरी गेला. शूर सैनिकाची अखेर रणमैदानात, नटसम्राटाची अखेर रंगमंचावरच, तशीच ह्या तेजस्वी वक्त्याची अखेर व्यासपीठावरच झाली. ते त्याच त्वेषाने भाषणानंतर झोपी गेले ते उठलेच नाहीत. कोकणी जनतेच्या काळजाचा तुकडा त्या दिवशी विधात्याने निर्दयपणे हिरावून घेतला. उणेपुरे ५० वर्षांचेही आयुष्य नाही. अलीकडच्या काळाचा विचार करता अल्पायुषीच; पण तेवढ्या काळात किती पैलूंची पदके छातीवर मिरविली त्यांनी, याला काही गणनाच नाही. ती सारी बिरुदे त्या अनभिषिक्त सम्राटाला जनतेनेच बहाल केलेली होती.. त्यांच्या लाडक्या नाथला!

वक्ता दशसहस्रेषु
लोकशाहीचा कैवारी! अशक्य वाटणाऱ्या कोकण रेल्वेची कल्पना सर्वप्रथम मांडणारे! अनाथांचा नाथ! प्रकाशाचा पुत्र! अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा अंगार! दुःखितांचे अश्रू पुसणारा प्रेषित! लोकशाहीच्या इतिहासातील चंदनगंधित पान! अशी एक ना अनेक बिरुदे.. पण माझे सर्वांत आवडते बिरुद ‘वक्ता दशसहस्रेषु!’ हे बिरुद त्यांना त्यांच्या ग्रामीण मतदारांनीच दिले होते, ज्या मतदारांनी त्यांच्या वक्तृत्वाचा सुगंध आणि सुरंग अनेक वर्षे घेतला. मलाही माझ्या आचरे गावात लहानपणी त्यांची ओघवती रसवंती मनसोक्त ऐकण्याचे भाग्य लाभले! विचारांनी आणि शब्दांनी त्या काळी आम्ही समृद्ध नव्हतो; पण त्या डौलदार, रसाळ, अमृततुल्य वक्तव्याचा, शब्दांचा गुंजारव अजूनही आमच्या कानी अगदी टवटवीत आहे, बकुळीच्या फुलासारखा!

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा।।

हे संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ आमच्या तुळपुळे सरांनी आम्हाला आठवीत शिकविला; पण त्यापूर्वी अगदी पाचवीपासून आणि पुढे अकरावीपर्यंत ‘वक्ता दशसहस्रेषु’ म्हणजे काय असते, हे आम्ही नाथ पै यांच्या रूपाने नेहमीच अनुभवत होतो. मी अकरावीत असतानाच त्यांचे निधन झाले. आमच्या घरात आणि गावातही कोणी तरी जवळचे माणूस देवाघरी गेले असाच सन्नाटा पसरला होता.

बालपणीच नाथ पैंचे शब्दसंस्कार
बॅ. नाथ पै यांची भाषणे मला लहानपणी मनसोक्त ऐकता आली ती माझा आतेभाऊ मधुकर वालावलकर (मालवण) याच्यामुळेच. त्याला आम्ही सर्व मधुदादा म्हणायचो. तो प्रजा समाजवादी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आणि नाथ पैप्रेमी! नाथ पैंना ‘ए नाथा’ म्हणून संबोधण्याएवढी त्याची आणि नाथ पै यांची जवळीक होती. नाथ पैदेखील मधुदादास ‘मधू’ या एकेरी नावानेच संबोधायचे. त्या वेळी मालवणचे अनेक कार्यकर्ते नाथ पैंना ‘नाथ’ ह्या एकेरी नावाने संबोधायचे. आम्हालाही ऐकायला मजा वाटायची. आमचे आचरे हे मधुदादाचे आजोळ. म्हणून ज्या वेळी नाथ पैंचा आचरे दौरा असायचा, त्या त्या वेळी मधुदादा आधीच आचऱ्यात येऊन दाखल व्हायचा. त्यांच्या सर्व भाषणांना त्याची उपस्थिती असायची. सभेच्या पूर्वतयारीसाठी तो येत असे.

तो स्थानिक कार्यकर्त्यांना भेटत असे; पण तो कधीही नाथ पै यांच्या गाडीतून यायचा नाही वा पक्षाच्या जीपमधूनही यायचा नाही. त्याचे मालवणहून येणे आणि जाणे एसटीनेच. पुढे सभास्थानी सगळी अनवाणीच पायपीट. मला मात्र तो अनेक वेळा पक्षाच्या जीपमध्ये बसवीत असे. जीपमध्ये बसण्याचे तेव्हा अप्रूप वाटायचे. एक-दोन वेळा तर बॅ. नाथ पै यांचे खासगी डॉक्टर याळगी यांच्या गाडीत मला प्रवेश मिळाला होता. आचऱ्यापासून पिरावाडीपर्यंतचा नाथ पै यांच्या बाजूला बसून केलेला तो प्रवास मला अजूनपर्यंतचा सर्वांत श्रीमंत प्रवास वाटतो. आचार्य अत्रेंची मुलूखमैदान तोफ, अटलबिहारी वाजपेयी यांची झुळुझुळु वाहणारी गंगेसारखी वाणी अशी भाषणे ऐकण्याची आम्हाला कधी गावात संधी नव्हती. म्हणून बॅ. नाथ पै यांची सभा आम्हा साऱ्यांसाठी अक्षरांची दिवाळी असायची! शब्दांची रोषणाई असायची!

नाथ पै येई गावा। तोचि दिवाळी दसरा।

त्या वेळी गावात नाथ पैंची सभा असली म्हणजे गाव मंतरून जायचे. नदीला भरती आल्यासारखी माणसांची मने उचंबळून यायची. गावात वीज नव्हती. घरी रेडिओ, ट्रान्झिस्टरचाही पत्ता नव्हता. रामेश्वर वाचन मंदिरातील गोष्टीची पुस्तके, रामेश्वर मंदिरात अधूनमधून होणारी, प्रख्यात कीर्तनकार बुवांची नारदीय कीर्तने हीच आमची शब्दांची श्रीमंती असायची. त्या दिवसांत नाथ पै यांची रसिकता, रसवत्ता आणि विद्वत्ता यांचे मनोज्ञ दर्शन घडविणारी ती भाषणे ऐकायला मिळणे ही प्रत्येक गावकऱ्यासाठी पर्वणी असायची. अगदी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातील संगमेश्वरपासून सिंधुदुर्गातील बांद्यापर्यंत ‘नाथ हा माझा मोही’ असेच होऊन जायचे. संध्याकाळ असेल तर मंदिराकडे जाणाऱ्या कंदिलाच्या रांगा दिसायच्या आणि दुपारची सभा असेल, तर पायपीट करीत सारे रामेश्वराचा सभामंडप गाठत. त्या वेळी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस होता; पण त्या पक्षाचे गावातील कार्यकर्ते ‘अरे आयकाक काय झाला? मत कोणाकव देव’ असे सांगून सभेला हजर असत. (शेवटी तेही वरचे मत म्हणजे लोकसभेचे मत आपल्या नाथला देऊन मोकळे होत.) म्हणून सर्व मतदारसंघात त्या वेळी आमदारापेक्षा खासदाराची मते जास्त असायची. ती मते वैयक्तिक नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि वक्तृत्वाची कमाई असायची.

कठीण वज्रास भेदू ऐसे
बॅ. नाथ पै हे शब्दप्रभू होते. विद्वज्जन सभेतील विद्वानच जणू. संसदेत प्रतिपक्षावर हल्ला करताना त्यांची वाणी ‘कठीण वज्रास भेदू ऐसी’ व्हायची, तर लोकसभेतील ते प्रश्न, ते वाद ज्या वेळी नाथ पै गावागावात आपल्या सर्वसामान्य मतदारांना समजावून सांगत, त्या वेळी तीच भाषा ‘मऊ मेणाहुनि मुलायम’ होत असे. १९६७ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शुभारंभाचे आचरे प्रभागाचे भाषण आचरे गावच्या रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात झाले होते. सभामंडप सर्वपक्षीय मतदारांनी फुलून गेला होता. नाथ पै एका लाकडी खुर्चीवर बसले होते. प्रकृती ठीक नसली, की ते अनेक वेळा बसून बोलत. तसे पाहता त्यांचा उभे राहून मतदारांशी थेट संवाद साधायचाच आग्रह असायचा; पण प्रत्येक गावातले गावकरी नाथला बसून बोलायचा आग्रह करीत. ज्येष्ठ माणसे तर त्यांना बसून बोलण्याचा हट्टच करायचे. ‘तुका बघ आमचो एकच गाव लाडको नाय हा, संगमेस्वरापासून बांद्यापर्यंत प्रत्येक वाडी-वस्तीवर बोलाचा हा, तू बाबा बसानच काय ता बोल’ अशा आग्रहामुळे नाथ पैंना बसूनच बोलावे लागे. नाथ पै त्या लाकडी खुर्चीत बसले, की त्या खुर्चीचे ‘सिंहासन’ होई आणि सभागृहाचा ‘राजप्रासाद!’ ही सारी जादू घडायची त्यांच्या मुखातील शब्दशक्तीच्या अथांग भांडाराने! युवा पिढीत तरुणाई जागविणाऱ्या त्यांच्या विचाराने! मरगळलेल्या मध्यमवर्गीयांच्या मनात विचारांची स्फुल्लिंगे पेटविणाऱ्या त्यांच्या वाणीने! आणि अन्यायाविरुद्ध अंगार बरसविणाऱ्या त्यांच्या शब्दांच्या अधिराज्यामुळेच!

तो अनभिषिक्त राजाचा राजमुकुट
त्या दिवशी आचरे प्रभागातील मतदारांना, कार्यकर्त्यांना संबोधताना नाथ पै यांचे ते भाषण शब्द आणि विचार यांना सोबत घेऊन आलेले होते. नाथ पै म्हणाले, ‘माझ्या आचरे प्रभागातील मातांनो आणि भगिनींनो, बंधूंनो आणि तीर्थरूपांनो, तुमचा ‘नाथ’ आज तुमच्याकडे काहीही मागायला आलेला नाही! तो तुम्हालाच द्यायला आलेला आहे. तुम्ही माझ्या शिरकमलावर विराजमान केलेला हा लोकशाहीचा रत्नजडित राजमुकुट तुम्हालाच परत करायला आलो आहे, जो राजमुकुट परिधान करून मी गेली पाच वर्षे लोकसभेत भांडलो, झगडलो, लढलो आणि गहिवरलोदेखील! मात्र तुमच्याच ह्या राजमुकुटाचे वैभव, पावित्र्य, मूल्य आणि तेज कदापीही लोप पावू दिले नाही. तुमची ही सेवा, तुमचे सहकार्य, तुमचा पाठिंबा आणि तुमचा चिरंजीव आशीर्वाद हीच संसदेतली माझी तलवार होती, शिवधनुष्य होते आणि विरोधकांना दे माय धरणी ठाय करणारे वाक्बाण होते.’

टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. शब्दांवर शब्द फेकीत ते सहजसुंदर काटेकोर बोलणे पुढे पुढे जात होते. दिल्ली येथील संसद भवनात काय चालते, संयुक्त महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न, बंदराचा विकास, महागाईचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न आदींसाठी आपण कसे झगडलो हे बाळबोध भाषेत नाथ पै मतदारांना समजावून देत होते. एक राजकीय प्रबोधनकार बोलावा तसे ते बोलत होते. नाथ पै श्रद्धेने बोलत होते. मतदारही अतीव श्रद्धेने श्रवण करीत होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी आवाहन केले – ‘मतदारांनो, आता तुम्हीच ठरवायचं आहे पुढील पाच वर्षांसाठी हा राजमुकुट कोणत्या शिरकमलावर चढवायचा आहे ते!’

आणि सभेतूनच आमचे बाबा घाडी जोराने म्हणाले, ‘तेच्यात ठरवचा काय हा? ह्यो राजमुकुट घालूचो म्हनजे काय खावची कामा आसत? बाबा! तुझ्याच डोक्यार तो आसा तसा ठेवन दी. चाळव नको.’

बाबा घाडी म्हणजे आमच्या गावचे बापू गोपाळ घाडी. त्यांच्या त्या शब्दांनंतर सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे नाथ पै भरघोस मतांनी निवडूनही आले. बाबा घाडींचे बोल म्हणजे तो नाथ पैंसाठी रामेश्वराचाच आशीर्वाद ठरला. शेवटी तो राजमुकुट अगदी शेवटपर्यंत नाथ पैंच्या शिरकमलावरच राहिला आणि नाथ पै झाले कोकणचे अनभिषिक्त सम्राट!

प्रतिपक्षावर कोणताही हल्ला न करता केलेले ते भाषण मला अजूनही चांगले स्मरते. त्या वेळी मी आठवीत होतो. नाथ पैंची भाषणे तोंडपाठ करायचा मला छंद लागला होता. एका काका आसोलकर (वायंगणी) यांच्या माडीवर समाजवादी कार्यकर्त्यांची एक बैठक होती. आमच्या मधुदादासमवेत मी गेलो होतो. मधुदादा नाथ पैंना मालवणीतूनच म्हणाला, ‘ह्यो बग तुझा भाषण तुझ्यासारखा करून दाखवता.’ १३-१४ वर्षांच्या एका मुलाचे कौतुक म्हणून सर्वांनीच ते पाच मिनिटांचे छोटेसे भाषण ऐकले. नाथ पै यांनी कौतुकही केले. कार्यकर्त्यांना संबोधताना ते अगदी हसत हसत म्हणाले होते, ‘शालेय मुलांच्या तोंडी कोणती गाणी असतात त्यावरून त्या देशाचे भविष्य सांगता येते… आणि मतदारसंघातील मुलांच्या तोंडी कोणाची भाषणे असतात, त्यावर त्या मतदारसंघातील खासदाराचे भवितव्य अवलंबून असते.’ असे म्हणून ते खदखदून हसले होते. मला त्यांनी बचकाभर ‘रावळगाव’ची छोटी चॉकलेट दिली होती. नाथ पैंच्या खिशात ती सामग्री मुलांसाठी सदैव असायचीच! माझे ते तर वक्तृत्व कलेतील पहिले इनाम… शब्दांच्या एका सम्राटाकडून लाभलेले!

नाथ पैंचा मिस्किलपणा आणि विनोदबुद्धी
आमच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या (आचरे हायस्कूल) सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा… ती तारीख होती १९ फेब्रुवारी १९६७. सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ अतिथींसोबत नाथ पैंनाही प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण होते. त्या वेळी आचरे गावात यायला आचरे-कणकवली रस्ताही अत्यंत कष्टप्रद होता.

निमंत्रित कोणीच मान्यवर अतिथी तसे आले नाहीत. नाथ पै मात्र दिल्लीहून गोवा (विमानाने) आणि तिथून कणकवलीमार्गे आचरे असे अगत्यपूर्वक आले. त्यांच्या मित्राची ती मोटार आचरे-कणकवलीतील तो खडबडीत, धुळीचा, खड्ड्यांचा रस्ता पार करीत जरा विलंबाने कार्यक्रमस्थळी आली. नाथदर्शन होताच लोकांची कळी खुलली! सभेला शुभारंभ झाला! नाथ यांनी प्रारंभीच, विलंब झाल्यामुळे समोरील जनता जनार्दनाला हात जोडले आणि गोड शब्दांत नाथ पै बोलू लागले…

‘माझ्या आचरेवासीयांनो, तुमच्या ह्या आचरे गावचा माझा प्रवास आज मी मोटारीतून, बोटीतून, रेल्वेतून आणि विमानातून करत करत येथे पोहोचलो.’

लोकांना नाथ पै आज असे का बोलत आहेत, याचा बोध होईना. मग नाथ पै मिस्किलपणाने, विनोदाने पुढे सांगू लागले, ‘मित्रहो, येताना वाटेतील खड्ड्यांमुळे मोटार एवढी उंच उडत होती, की मी विमानातच आहे असं मला वाटायचं. बेळणे-रामगड रस्त्यावर ती एवढी डुलायला लागली, की मला ‘चंद्रावती’ बोटीत असल्याचा भास झाला आणि आडवलीपासून त्रिंबकपर्यंत की एवढी हळू चालवावी लागली, की मिरज-कोल्हापूर मीटर गेज रेल्वेमधूनच चाललो आहे असे वाटू लागले.’

लोक खदखदून हसू लागले. नंतर त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल राज्यकर्त्यांवर ताशेरे ओढले; पण त्यासाठी आपणही प्रयत्नशील राहणार आहोत, असे आश्वासनही दिले आणि पाळलेही! असा होता त्यांचा मिस्किलपणा.

ये हृदयीचे ते हृदयी गेलेले भाषण
… त्यानंतर पुढे एक तास ते पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत असताना जणू स्फूर्तिदायी चैतन्याची कारंजी उसळत होती. शालेय मुलांना लोकशाही, पालकांना समाजवाद आणि शिक्षकांना संसदकार्य समजावून देताना त्यांची वाणी अगदी ‘बालभारती’ झाली होती. ते म्हणाले –

आपल्या भारताच्या भवितव्याचा निर्णय लोकसभेत होत नसतो, तो होत असतो तुमच्या गावात, तुमच्या शब्दांत, तुमच्या ह्या अशा सभांमध्ये. हिंदुस्थानचा खरा जन्म होत असतो तुमच्या मनामध्ये! आणि हिंदुस्थानची खरी तलवार उभी राहते तुमच्या मनगटांमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील न्यूनगंडाची भावना गेली पाहिजे. मान वाकणार नाही, गुडघा टेकणार नाही, हे मनगट पिचणार नाही, अशी भावना ह्या भारतदेशी निर्माण झाली पाहिजे! मग आम्हाला ना चीनची भीती! ना पाकिस्तानची!

ओघवती रसवंती आणि विचारांची इंद्रधनुष्ये, माझी ५० वर्षे पूर्ण केलेली ती शाळा धीरगंभीर होऊन जणू ऐकत होती. विचारांचे वैभव, भावनांचे ऐश्वर्य आणि मराठी भाषेचे सौष्ठव म्हणजे काय असते, ते केवळ श्रोत्यांनीच नाही, तर त्या शाळेच्या चिऱ्याचिऱ्यानं कर्णसंपुटात साठवून ठेवले असेल.

गीता, गाथा, ज्ञानेश्वरी आणि सुभाषिते
गावागावात ज्या वेळी अशी भाषणे व्हायची, तेव्हा नाथ पैंच्या भाषेत गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, संस्कृत सुभाषिते यांची पेरणी व्हायची. काव्याशास्त्रविनोदाची पखरण व्हायची. अनेक संस्कृत सुभाषिते त्यांना मुखोद्गत होती. त्यांचा ते अर्थ सांगून योग्य वेळी उपयोग करायचे.

संस्कृत उच्चारणसुद्धा कसे? एखादा शास्त्री, पंडित बोलावा तसे, शुद्ध वाणी आणि निर्दोष उच्चार! आचरे गाऊडवाडीला अशीच एक प्रचारसभा होती. सभेच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेत्याने नाथ पैंना झोंबणारी अशी जहरी टीका केलेली. त्यामुळे सभेपूर्वी वातावरण थोडेसे तंग! त्या वेळी आचरे प्रभाग हा प्रजासमाजवादी पक्षाचा बालेकिल्लाच होता. सभेपूर्वी साथी श्याम कोचरेकर बोलले. ते तावातावाने आणि घणाघाती बोलत होते. त्या वक्तव्याने सर्वांचा राग अधिकच भडकत होता; पण नाथ पै मात्र स्मितहास्य करीत चौफेर पाहत होते. साथी श्यामराव कोचरेकर यांचे प्रास्ताविक झाल्यावर नाथ पै बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी शुभारंभालाच पुढील सुभाषित उच्चारले…

शैलो यथैकघनो वातेन न समीर्यते।
एवं निन्दाप्रशंसासु पण्डितो न समीर्यते।।

पुढे म्हणाले, ‘मित्रहो, अशा स्वरूपाचे एक संस्कृत सुभाषित आहे. शैल म्हणजे पर्वत. एक घन म्हणजे मजबूत. ज्याप्रमाणे अत्यंत मजबूत असा पर्वत ‘वातेन’ म्हणजे वाऱ्याने उडवला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे ह्या निंदा आणि स्तुतीने तुमचा नाथ पै कधीही विचलित होणार नाही. यापूर्वी झाला नाही आणि यानंतरही होणार नाही.’

‘पण्डितो’ येथेच आपले नाव घालून नाथ पै यांनी त्या टीकेलाच चौकार मारला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ते संस्कृत सुभाषित श्रोत्यांच्या मनाची कवाडे उघडून अलगद त्यांच्या हृदयात जाऊन बसले!

पुढे जवळजवळ वीस मिनिटे ह्या सुभाषितांचा आधार घेऊन ते बोलत होते. ते म्हणाले, ‘समाजात वावरताना लोकप्रतिनिधीला अनेक लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. लोकप्रतिनिधीने जसे स्तुतीमुळे हुरळून जाऊ नये, तसेच अहंकाराने फुलूनही जाऊ नये. निंदेमुळे खचू नये आणि न्यूनगंडाने ग्रस्तही होऊ नये. आपल्यामध्ये काही त्रुटी असतील, तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने ही तपासून घेण्याची संधी मानावी. ही टीका, हे प्रहारच मला भरघोस मतांनी निवडून देतील, यात संदेह नाही.’

नाथ पै यांची भविष्यवाणी खरीही ठरली. आज ‘बॅ. नाथ पै यांचे आम्ही वारसदार’ असे म्हणवून घेणाऱ्या किती लोकप्रतिनिधींपाशी हा संयम आणि विद्वत्ता आहे, याचे संशोधनच करावे लागेल.

बॕ. नाथ पै सेवांगण, मालवण. नाथ यांचे कार्य पुढे अखंड चालू ठेवण्यासाठी नाथप्रेमींनी उभारलेली ही संस्था

लेखक, कलावंत आदींचा गौरव
केवळ राजकीयच नाही, तर सामाजिक विषयावरील नाथ पै यांची भाषणे संग्राह्य असायची. ‘गुणी गुणं वेत्ती’ असे एक संस्कृत सुभाषित आहे. त्या सुभाषिताप्रमाणेच ते गुणगौरवाचे बोल असायचे. अशा वेळी त्यांच्या कल्पक आणि संवेदनशील प्रतिभेचे दर्शन होत असे. १९७० साली महाबळेश्वर येथे बा. भ. बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात उद्घाटनाचे बॅ. नाथ पै यांनी केलेले भाषण त्यांच्या साहित्य-शास्त्र-विनोदाचा आगळा नजराणा होतो. ती ध्वनिफीत माझ्या संग्रहात काल-परवापर्यंत होती. आमच्या मधुदादानेच ती भेट दिली होती. नंतर नाथ पै यांच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्दालंकार वाचण्याचा जणू छंद लागला. त्यात मला त्यांच्या वक्तृत्वाच्या अनेक छटांचे दर्शन झाले.

नाथ पैंप्रमाणेच २५ सप्टेंबर हाच ज्यांचा जन्मदिन आहे, असे उत्कृष्ट कवी, अभिनेते आणि नाटककार बाळ कोल्हटकर यांचा बेळगाव मुक्कामी ‘दूर्वांची जुडी’साठी सत्कार करताना नाथ पै म्हणाले होते, ‘लेखक, कलावंत हे फार थोर असतात. आम्ही पुढारी आणि आमचे जीवनही मामुली. आमची ही क्षणभंगुर दुनिया आमच्यासोबतच नष्ट व्हायची. परंतु लेखक, कवी, नाटककार, कलावंत यांचे विश्व अविनाशी आहे. अकबराच्या वेळी प्रधान कोण होता, हे कोणाला माहिती नाही; पण अकबराच्या वेळचा तानसेन हाच भारतवर्षाला माहिती आहे. राजा विक्रमाचा मुख्यमंत्री कोण होता हे कोणालाच स्मरत नसेल, पण त्याच राज्यातील कविकुलगुरू कालिदासाला आम्ही विसरू शकत नाही. जोपर्यंत भारतीय संस्कृती असेल, तोपर्यंत ही नावे अमर आहेत.’

या नाथ पै यांच्या वाणीला म्हणतात माधुर्याला मधुरता प्रदान करणारी वाणी.

लोकसभेतील वक्तृत्वाचा धबधबा
नाथ पैंची लोकसभेतील भाषणे ऐकण्याची वा वाचण्याची संधी मिळाली नाही; पणे असे वाचले आहे, की बॅ. नाथ पै संसदेत एखाद्या प्रश्नावर बोलायला लागले, की भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंपासून त्या वेळचे केंद्रीय मंत्री गोविंद वल्लभ पंतांपर्यंत आणि पंत लालबहादूर शास्त्रींपासून पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत सारेच ते भाषण लक्षपूर्वक ऐकत असत. याचे कारण देत असतात बॅ. नाथ पै यांचे समकालीन आणि त्यांची भाषणे लोकसभेत ऐकायची संधी ज्यांना मिळाली असे ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनी एका ठिकाणी सांगितले होते, ‘संसदेत बोलण्यापूर्वी नाथ पै यांची पूर्वतयारी अफाट असे. टिपण्या काढणे, पुरावे गोळा करणे, त्या भाषणासाठी एखादा संस्कृत, जर्मन वा फ्रेंच सुविचार, एखादा चुटका, गांधी, नेहरू, टागोर आदींचे विचार, एखादी सुंदर कविता आदी सारी आयुधे घेऊनच ते सभागृहात पदार्पण करीत!’

आज ही संख्या संसदेत किती आहे ते मोजावेच लागेल. नाथ पै यांच्या भाषणाचे आदरणीय ना. ग. गोरे यांनी केलेले वर्णन आज प्रत्येकाने वाचावे. म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाची थोडी तरी कल्पना येईल.

ते म्हणतात, ‘नाथ पै यांची दैवी आवाजाची आणि शब्दकळेची देणगी आणि तिच्यावर चढविलेला सुभाषितांचा, विचारांचा साजशृंगार! घवघवीत नथ-बुगडी ल्यायलेल्या आणि भरजरी शालू नेसलेल्या दुर्गाबाई खोटे आनंदीबाईच्या भूमिकेत रंगभूमीवर आल्या, की जसा सगळा मंच भरून गेल्यासारखे वाटे, तसेच नाथ पैंची लावण्यमयी वाणी साजशृंगार करून व्यासपीठावर उभी राहिली, की सारी सभाच दंग होऊन जाई.’

असे हे ‘पुन्हा न होणे’सारखेच वक्तृत्व! लहानपणी माझे भाग्य, ती असामान्य बुद्धिमत्ता, अफाट लोकसंग्रह आणि ते अमोघ वक्तृत्व अगदी जवळून पाहता आले. आज ते सारे सांगायला गेले, तर दंतकथाच वाटेल. लोक म्हणतील, हा स्वप्नातील राजपुत्र होता.

स्वयमेव मृगेन्द्रता
आज बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता आज होत आहे. वर्षे कधीच ‘कापूर’ होऊन निघून गेली, तरीपण भाषासौंदर्य आणि विचारसौंदर्य यांनी नटलेला महाराष्ट्रदेशीचा एक वाचस्पती आमच्या बालपणी आम्हीही मनमुराद ऐकला होता, ही आमची शब्दांची श्रीमंती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

नाथ पै यांचे एक आवडते सुभाषित होते –
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते मृगैः।
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता।।

अशा या वक्तृत्वाच्या राज्यातील ‘स्वयमेव मृगेन्द्रा’ला आमचे अभिवादन.

 • सुरेश श्यामराव ठाकूर
  पत्ता :
  १२८, आचरे-पारवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  मोबाइल : ९४२१२ ६३६६५
  ई-मेल : surshyam22@gmail.com
  (ललित लेखक, स्तंभलेखक; कार्योपाध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष; अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
  ………..

बॕ. नाथ पै नेहमी सांगत, की माझ्या ओजस्वी वक्तृत्वाचे मूलस्रोत म्हणजे माझ्या कोकणचे दशावतारी कलाकार. मतदारसंघात दौरा असला आणि जवळपास दशावतारी नाटक असल्याचं कळलं, की नाथ पै आवर्जून त्याचा आस्वाद घ्यायचे. दशावतारी कलाकारांना त्यांना बघून पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आल्यासारखे वाटायचे. अशाच एका हृद्य प्रसंगाची आठवण पाहा सोबतच्या व्हिडिओत…

(हा लेख सिंधुसाहित्यसरिता या पुस्तकातील आहे. सुरेश ठाकूर हे या पुस्तकाचे संपादक असून, सत्त्वश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात नाथ पैंसह सिंधुदुर्गातील एकूण २२ साहित्यिक व्यक्तिमत्त्वांबद्दलचे लेख आहेत. या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media