मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने दिवाळी अंक स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. संघाने आयोजित केलेली ही ४७ वी स्पर्धा आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे. संस्थेने ४७ वे राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १९७६ पासून विनामूल्य घेतली जाते. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही अंक येत असतात. सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट
विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक, गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, यासह उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी गौरव करण्यात येतो.
स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी आलेले हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. त्यानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात. दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी अंकाच्या दोन प्रती रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम नं. ६१२, सहावा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र मालुसरे (९३२३११७७०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
