रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना करण्याबाबत कार्यकर्त्यांच्या सभेत चर्चा झाली. ग्राहक शक्ती संघटित झाली पाहिजे, असे आवाहन संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी यावेळी केले.
सर्वसामान्य ग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणारी ग्राहक पंचायत ही संस्था, तिची रचना, तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धतीची ओळख रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना व्हावी, या उद्देशाने रत्नागिरीत राज्य सचिव श्री. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक खऱ्या अर्थाने ग्राहक राजा होण्यासाठी त्याला त्याचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यासाठी ग्राहकांचे संघटन महत्त्वाचे आहे. शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी ग्राहक शक्ती संघटित झाली पाहिजे, असे प्रतिपादन श्री. वाघमारे यांनी यावेळी केले. ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा असून आज ग्राहकाची अनेक प्रकारे फसवणूक आणि अडवणूक होत आहे. ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन आणि ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून केले जात आहे. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था काम करीत आहे, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, वस्तू आणि सेवा खरेदी करणारी प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. ग्राहकांच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्य करणारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही एक अग्रगण्य संस्था आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापन केलेली ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये ग्राहकजागृतीचे कार्य करीत आहे. कोकण विभागासह रत्नागिरी जिल्ह्यात ही चळवळ पोहोचविण्याच्या दृष्टीने या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संस्था, संस्थेची नोंदणी, तत्त्वज्ञान, रचना आणि कार्यपद्धती याबाबत संस्थेचे राज्य सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. लवकरच एक सभा आयोजित करून ग्राहक पंचायतीची रत्नागिरी जिल्हा शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत रत्नागिरी प्रतिनिधी विकास घाडीगावकर यांनी केले, तर संदेश सावंत यांनी आभार मांडले.



