बालदिनानिमित्त आज रत्नागिरीत बालकांकडून ‘स्वराभिषेक’

रत्नागिरी : निरागसता नेहमीच लोभस असते. इतर कोणत्याही विकार-विचारांचा स्पर्श त्याला झालेला नसतो. म्हणूनच लहान मुले निरागस असतात. अशाच निरागस सुरांची मैफल आज (१४ नोव्हेंबर २०२२) रत्नागिरीकर रसिकांचे कान तृप्त करणार आहे. या मैफलीत गायन तर लहान मुले करणार आहेतच; पण संवादिनी, तबला, पखवाज, तालवाद्यं आदींची साथही मुलेच करणार आहेत. एवढेच नव्हे, तर या मैफलीचे निवेदनही मुलेच करणार आहेत. मैफलीचे ध्वनिसंयोजन आणि आयोजनही मुलेच करणार आहेत. ‘सूर निरागस’ असे या मैफलीचे नाव आहे. ही मैफल सायंकाळी सात वाजता थिबा पॅलेसजवळच्या प. पू. गगनगिरी महाराज आश्रम रंगमंचावर होणार आहे.

ही केवळ एक टूम नाही. रंगमंचीय आविष्कारासाठी तावून-सुलाखून निघालेली ही बालके आपली निरागस, परंतु तयारीची गायकी आणि साथीने ठसा उमटवतील हा आत्मविश्वास असल्यानेच बालदिनानिमित्त ‘स्वराभिषेक’ संगीतवर्गाने हे धाडसी पाऊल उचलले आहे. या साऱ्या छोट्या शिलेदारांना तयार करणाऱ्या विनया परब यांचे संगीत संयोजन. ‘सबकुछ बालक’ असलेली ही मैफल रसिकांसाठी आगळीवेगळी मेजवानी ठरणार आहे.

‘स्वराभिषेक’तर्फे सौ. विनया परब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संगीतसाधक, शास्त्रीय गायक घडवण्याबरोबरच ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट’ तयार करण्यावरही सातत्याने भर दिला जातो. त्याकरिता दर महिन्यातून एका सोमवारी गायनवर्गातील विद्यार्थ्यांची मासिक मैफल सादर होते. प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या सहकार्याने तेथील रंगमंचावर होणाऱ्या मैफलीचे नियोजनही विद्यार्थीच करतात. यातून त्यांना ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे, तसेच रंगमंचीय सादरीकरण आत्मविश्वासाने करण्याचे, गीतगायनाचे धडे मिळतात. गुरुपौर्णिमा, दिवाळी पहाट या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन हा या उपक्रमांचाच एक भाग असतो.

या मैफलीत हृषीकेश ढवळीकर (गोवा), आदित्य दामले, स्वरा भागवत, ऋग्वेदा हळबे आणि वेदिका गांधी हे बालकलाकार शास्त्रीय, तसेच सुगम गायन करणार आहेत. त्यांना आदित्य पंडित, श्रीरंग जोगळेकर, ओजस करकरे, स्वरा भागवत आणि ऊर्जा आपटे हे विद्यार्थी संवादिनीची, स्वरूप नेने, सारंग जोशी हे तबल्याची, यश बने पखवाजची, तर अद्वैत मोरे तालवाद्याची साथ करणार आहे. ईशा रहाटे आणि स्वरा लाकडे या विद्यार्थिनी निवेदनाची बाजू सांभाळणार असून, ध्वनिसंयोजन राधिका बेर्डे करणार आहे. प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे व्यवस्थापक राम पानगले, संवादिनीवादक चैतन्य पटवर्धन यांच्यासह ‘स्वराभिषेक’चे पालक आणि वादक यांचे याकरिता सहकार्य लाभले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन ‘स्वराभिषेक’तर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply