शेतकर्‍यांविषयीच्या कृतज्ञतेसाठी दापोलीत सायकल फेरी

दापोली : शेतकर्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने दापोलीत आगळवेगळी सायकल फेरी आज (दि. २५ डिसेंबर) काढण्यात आली. त्याला दापोलीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरवर्षी भारतात २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. स्वत:च्या रक्ताचे पाणी करून संपूर्ण जगाच्या भुकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि त्याचे आभार मानण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते.

दापोलीच्या आझाद मैदानातून सुरू झालेली सायकल फेरी उदयनगर- लष्करवाडी- फणसाचे वाकण- चैतन्य नगर- अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स- इच्छापूर्ती गणेश मंदिर- आझाद मैदान अशा ५ किलोमीटरवर पार पडली. मातीतून सोने उगवणाऱ्या शेतकरी बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या मार्गावरील काही शेतकरी बांधवांचा गौरव करण्यात आला. त्यांचे आभार मानण्यात आले.

या फेरीदरम्यान वेलकम नर्सरी, अश्विनी अ‍ॅग्रो फार्म्स येथे प्रभाकर शिंदे आणि परिवाराने शेतीतील वेगवेगळी पिके, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मसाला पिके, शेतीच्या पद्धती, झाडांबद्दल परिपूर्ण माहिती सांगितली. अनेकांनी याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारून अधिक माहिती जाणून घेतली. ज्ञानात भर पडल्यामुळे सर्वजण खुश होते. अन्नाचे महत्त्व, ते तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, मेहनत, कष्ट याबद्दल अधिक समजले. ताटातील अन्न वाया न घालवण्याचा पण यावेळी सर्वांनी केला.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. ते पटवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निघालेल्या या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, सूरज शेठ, आमोद बुटाला, सर्वेश बागकर, रोहन कदम, सुधीर चव्हाण, संजय पिंगळे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकलविषयक अनेक उपक्रम विनामूल्य राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply