रत्नागिरीत १४-१५ जानेवारीला वेबसिरीज निर्मिती, व्यवसाय संधी कार्यशाळा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या १४ आणि १५ जानेवारीला वेबसिरीज निर्मिती आणि व्यवसाय संधीविषयीची कार्यशाळा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थांना भविष्यकालीन व्यवसाय संधी निर्माण करून देण्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय विविध कार्यशाळांचे आयोजन करीत असते. या कार्यशाळांतून विद्यार्थांना नावीन्यपूर्ण आणि व्यवसायोपयोगी रोजगार कौशल्ये प्राप्त होत असतात. मनोरंजन क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविधांगी संधींची ओळख करून देण्यासाठी महाविद्यालयातील फिल्म क्लबने ‘वेबसिरीज निर्मिती आणि व्यवसाय संधी’ या कार्यशाळेचे आयोजन येत्या १४ आणि १५ जानेवारी रोजी केले आहे. ‘दि ब्रोकन न्यूज’ आणि ‘आरण्यक’सारख्या प्रसिद्ध वेब सिरीजचे दिग्दर्शक विनय वायकूळ या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

विनय वायकूळ यांनी थ्री इडियट्स, स्वदेश, भाग मिल्खा भाग, गजनी, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., बस एक पल, शिखर या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आरण्यक या वेबसिरीजसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक सन्मान विजेतेपद त्यांना प्राप्त झाले आहे.

रत्नागिरीच्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी १०० रुपयांचे नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थांनी आपली नावे समन्वयक डॉ. निधी पटवर्धन (९४२१४३९६६४) किंवा प्रा. सचिन सनगरे (८७९३४५०३२८) यांच्याकडे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply